विशाखापट्टणम कसोटीत विजय मिळवत भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेत १-० ने आघाडी घेतली. पुण्यातील गहुंजे मैदानावर दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. नाणेफेक जिंकत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र पुण्याच्या गहुंजे मैदानात खेळताना भारतीय संघ कमनशिबी ठरला आहे.

या मैदानावर भारतीय संघाने खेळलेल्या अखेरच्या वन-डे आणि टी-२० सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. २७ ऑक्टोबर २०१८ साली भारत या मैदानावर वेस्ट इंडिजविरोधात अखेरचा वन-डे सामना खेळला. ज्यामध्ये विंडीजचा संघ ४३ धावांनी जिंकला होता.

तर ९ फेब्रुवारी २०१६ साली भारत या मैदानावर श्रीलंकेविरोधात अखेरचा टी-२० सामना खेळला होता. ज्यामध्ये महेंद्रसिंह धोनीच्या भारतीय संघाला लंकेने ५ गडी राखून हरवलं होतं.

दरम्यान पहिल्या दिवशीच्या खेळात भारतीय खेळाडूंनी संयमी सुरुवात केली. सलामीवीर रोहित शर्मा झटपट माघारी परतल्यानंतर मयांक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजाराने सावधपणे खेळ करत भारताचा डाव सावरला. पहिल्या सत्रापर्यंत भारताने एक गडी गमावत ७७ धावा केल्या.