Jasprit Bumrah Record: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि वेस्टइंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामना सुरू आहे. दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या सामन्यात वेस्टइंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय फसला. कारण वेस्टइंडिजचा पहिला डाव अवघ्या १६२ धावांवर आटोपला. या डावात भारतीय गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराहने ३ गडी बाद केले. यासह त्याने मोठ्या विक्रमात दिग्गज खेळाडूची बरोबरी केली आहे.

या डावाच्या सुरूवातीला मोहम्मद सिराजने वेस्टइंडिजला पहिला मोठा धक्का दिला. त्याने तेजनारायण चंद्रपॉलला झेलबाद करत माघारी धाडलं. त्यानंतर बुमराहने वेस्टइंडिजच्या दुसऱ्या सलामीवीराला पॅव्हेलियनची वाट दाखवली. कँपबेल अवघ्या ८ धावांवर माघारी परतला. बुमराहने या डावात ३ गडी बाद केले. तर मोहम्मद सिराजने सर्वाधिक ४ गडी बाद केले. तर कुलदीप यादवने २ आणि वॉशिंग्टन सुंदरने १ गडी बाद केला. कँपबेलला बाद केल्यानंतर त्याने शेवटी गोलंदाजी करताना २ भन्नाट यॉर्कर चेंडू टाकून जस्टिन ग्रीव्हज आणि जोहान लेन यांना बाद केलं. यासह त्याने मायदेशात खेळताना ५० गडी बाद करण्याचा पल्ला गाठला आहे.

मोठ्या विक्रमात दिग्गज खेळाडूची केली बरोबरी

बुमराहने मायदेशात गोलंदाजी करताना २४ व्या डावात ५० गडी बाद करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे.या विक्रमात त्याने माजी गोलंदाज जवागल श्रीनाथ यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. जवागल श्रीनाथ यांनी देखील २४ व्या डावात गोलंदाजी करताना ५० गडी बाद करण्याचा पराक्रम केला होता. दिग्गज गोलंदाज कपिल देव यांनी हा पराक्रम २५ व्या डावात केला होता. तर ईशांत शर्माने २७ व्या डावात गोलंदाजी करताना ५० गडी बाद केले होते.

मायदेशात खेळताना सर्वात जलद ५० गडी बाद करणारे भारतीय गोलंदाज (डावात)

जसप्रीत बुमराह- २४ डावात
जवागल श्रीनाथ- २४ डावात
कपिल देव- २५ डावात
ईशांत शर्मा- २७ डावात
मोहम्मद शमी – २७ डावात