अहमदाबाद येथे भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात तीन वनडे मालिकेतील शेवटचा सामना खेळला जात आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने पहिले दोन सामने जिंकून मालिका जिंकली आहे. तिसरा एकदिवसीय सामना जिंकून त्यांना पहिल्यांदा वेस्ट इंडीजला क्लीन स्वीप देण्याची संधी आहे. मात्र, या सामन्यात टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली शून्यावर माघारी परतला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणार्या टीम इंडियाने ५० धावांत ३ विकेट गमावल्या. विराट कोहली पुन्हा एकदा फलंदाजीत फ्लॉप ठरला. त्याला खातेही उघडता आले नाही. भारतीय डावाच्या चौथ्या षटकात अल्झारी जोसेफने त्याला बाद केले.
हेही वाचा – VIDEO : श्रीशांतची ‘भन्नाट’ स्विंग गोलंदाजी पाहिली का? IPLपूर्वी फलंदाजाला केलं क्लीन बोल्ड!
याआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत विराट कोहली शून्यावर बाद झाला होता. कोहली वनडे कारकिर्दीत १५व्यांदा आणि वेस्ट इंडीजविरुद्ध तिसऱ्यांदा शून्यावर बाद झाला आहे. यासह, त्याने वीरेंद्र सेहवाग आणि सुरेश रैनाचा एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याचा विक्रम मोडला. सचिन तेंडुलकर (२०) हा एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा भारतीय फलंदाज आहे. त्याच्यापाठोपाठ युवराज सिंग (१८) आणि सौरव गांगुली (१६) यांचा क्रमांक लागतो.
विराट कोहलीच्या १४ वर्षांच्या आणि २६० एकदिवसीय सामन्यांच्या दीर्घ कारकिर्दीतील ही दुसरी वेळ आहे, जेव्हा त्याने तीन एकदिवसीय सामन्यांच्या द्विपक्षीय मालिकेत १० पेक्षा कमी धावा केल्या आहेत. यापूर्वी २०१२-१३ मध्ये पाकिस्तानविरुद्ध त्याने ३ डावात १३ धावा केल्या होत्या.