उप-कर्णधार अजिंक्य रहाणेची आक्रमक शतकी खेळी आणि भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळवला. २ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत सध्या १-० ने आघाडीवर आहे. अजिंक्य रहाणेने या कसोटी सामन्यात पहिल्या डावात ८१ तर दुसऱ्या डावात १०२ धावा केल्या. या खेळीदरम्यान अजिंक्य रहाणेने एक विक्रम केला आहे. भारतीय संघात कसोटी क्रिकेटमध्ये ५ किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येत असताना रहाणेचं हे ९ वं शतक ठरलं.

अजिंक्यने यावेळी भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांचा विक्रम मोडला. कसोटी क्रिकेटमध्ये ५ किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येताना कपिल देव यांनी ८ शतकं झळकावली आहेत. अजिंक्य रहाणे या यादीत चौथ्या क्रमांकावर पोहचला आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये ५ किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येताना सर्वाधिक शतकं झळकावणारे भारतीय फलंदाज –

  • १) मोहम्मद अझरुद्दीन – २० शतकं
  • २) व्हीव्हीएस लक्ष्मण – ११ शतकं
  • ३) सौरव गांगुली/पॉली उम्रीगर – १० शतकं
  • ४) अजिंक्य रहाणे – ९ शतकं
  • ५) कपिल देव – ८ शतकं

या कसोटी मालिकेतला दुसरा कसोटी सामना ३० ऑगस्टपासून सुरु होणार आहे.