विंडीजविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने २२ धावांनी विजय मिळवला. भारताने सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना १६७ धावांपर्यंत मजल मारली. पावसाने व्यत्यय आणल्यामुळे डकवर्थ लुईस नियमाच्या आधारावर विंडीजला सुधारित आव्हान देण्यात आले होते. डकवर्थ लुईस नियमानुसार वेस्ट इंडिजच्या संघाला १२० धावा करणं गरजेचं होतं. या धावसंख्येचा पाठलाग करताना विंडीजला १५.३ षटकांत ९८ धावांपर्यंतच मजल मारता आली. या विजयासह भारताने ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.

विंडीजला पराभूत करून भारताने एक दमदार पराक्रमदेखील केला. भारताने या विजयासह दोन वेळा टी २० विश्वविजेतेपद जिंकलेल्या विंडीजला सलग सामन्यात सर्वाधिक वेळा पराभूत करण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली. भारताने विंडीजला सलग ५ सामन्यात विंडीजला पराभूत केले. याआधी पाकिस्तानने विंडीजला सलग ५ सामन्यात पराभूत केले होते. भारत आणि विंडीज यांच्यात एकूण १३ टी २० सामने झाले आहेत. त्यापैकी ७ सामने भारताने जिंकले आहेत. महत्वाचे म्हणजे त्यातील ५ सामने भारताने सलग जिंकले. २०१८ मध्ये खेळण्यात आलेल्या टी २० मालिकेत भारताने विंडीजला पराभूत केले होते. हे सामने नोव्हेंबर २०१८ मध्ये खेळवण्यात आले होते. त्यानंतर अमेरिकेत झालेल्या या २ सामन्यात भारताने विजय मिळवला.

त्याआधी, सलामीवीर रोहित शर्माच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर, भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात १६७ धावांपर्यंत मजल मारली. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा विराट कोहलीचा निर्णय भारतीय सलामीवीरांनी सार्थ ठरवला. मात्र त्यानंतर भारतीय डावाला गळती लागली. मधल्या फळीतले फलंदाज अपेक्षेप्रमाणे धावा जोडू शकले नाहीत. विंडीजकडून थॉमस-कॉट्रेल जोडीने अखेरच्या षटकांमध्ये भेदक मारा केला.

रोहित-शिखर जोडीने पहिल्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी केली. भारतीय सलामीवीरांची फलंदाजी पाहता भारत मोठी धावसंख्या उभारणार असं वाटत होतं. मात्र किमो पॉलने शिखर धवनचा त्रिफळा उडवत भारताला पहिला धक्का दिला. यानंतर रोहित शर्माने कर्णधार विराटच्या साथीने काहीकाळ डाव सावरला. यादरम्यान रोहितने आपलं अर्धशतकही साजरं केलं. मात्र अखेरच्या षटकांत फटकेबाजी करण्याच्या नादात थॉमसच्या गोलंदाजीवर तो झेलबाद होऊन माघारी परतला. त्याने ५१ चेंडूत ६७ धावांची खेळी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यानंतर भारताच्या मधल्या फळीतल्या फलंदाजांनी निराशा केली. ऋषभ पंतही सलग दुसऱ्या सामन्यात धावा करण्यात अपयशी ठरला. थॉमसच्या गोलंदाजीवर पोलार्डकडे झेल देत पंत माघारी परतला. कर्णधार विराट कोहलीही उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात कॉट्रेलच्या गोलंदाजीवर माघारी परतला. मनिष पांडेही झेलबाद होऊन माघारी परतल्यामुळे मोक्याच्या क्षणी भारत धावा जमवू शकला नाही. अखेरीस कृणाल पांड्याने रविंद्र जाडेजाच्या साथीने अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत भारताला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. वेस्ट इंडिजकडून ओश्ने थॉमस, शेल्डन कॉट्रेल यांनी प्रत्येकी २-२ तर किमो पॉलने एक बळी घेतला.