विंडीजविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने २२ धावांनी विजय मिळवला. भारताने सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना १६७ धावांपर्यंत मजल मारली. पावसाने व्यत्यय आणल्यामुळे डकवर्थ लुईस नियमाच्या आधारावर विंडीजला सुधारित आव्हान देण्यात आले होते. डकवर्थ लुईस नियमानुसार वेस्ट इंडिजच्या संघाला १२० धावा करणं गरजेचं होतं. या धावसंख्येचा पाठलाग करताना विंडीजला १५.३ षटकांत ९८ धावांपर्यंतच मजल मारता आली. या विजयासह भारताने ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली.
India beat West Indies by 22 runs in a rain-affected T20I!
Krunal Pandya finished with excellent figures of 2/23 off his 3.3 overs.#WIvIND pic.twitter.com/buizhDBNnQ
— ICC (@ICC) August 4, 2019
या सामन्यानंतर बोलताना विराट म्हणाला की सामना जिंकणे हे कायमच आनंददायी आणि सुखावह असते. पण मालिकेत सामने शिल्लक असताना मालिका जिंकली तर ते अधिक चांगले असते. याचे कारण मालिका जिंकल्यावर दुसऱ्या खेळाडूंनादेखील सामन्यात संधी देता येते. संघात बदल करण्याचा एक चांगला पर्याय उपलब्ध होता. त्यामुळे आता आम्ही मालिका जिंकलो असल्याने आम्ही आमच्या संघात बदल करण्यासाठी मोकळे झालो आहोत. ३ सामन्यांच्या मालिकेत सुरुवातीचे २ सामने जिंकल्याने कर्णधार आणि संघ व्यवस्थापनाला थोडा दिलासा मिळालेला असतो. तिसरा सामना गुयाना येथे आहे. तेथे मी आधी खेळलेलो नाही. त्यामुळे तेथे जाऊन खेळण्यासाठी मी उत्सुक आहे.
“खेळपट्टी अत्यंत चांगली होती. सुरुवातीच्या षटकांमध्ये चेंडू चांगला उडत होता आणि बॅटवर येत होता. आम्ही चांगली धावसंख्या उभारू शकलो. पण दुसऱ्या डावात मात्र खेळपट्टीचा रोख बदलला. चेंडू खेळणे अधिकच कठीण झाले. त्याचा फटका विंडीजला बसला. गोलंदाजीत वॉशिंग्टन सुंदर याने उत्तम कामगिरी केली. नव्या चेंडूने चेंडू स्पिन करणे कठीण असते. पण त्याने दमदार कामगिरी केली. तसेच फलंदाजी करताना बकरुणाल पांड्या आणि रवींद्र जडेजा या दोघांनी देखील झकास कामगिरी करून दाखवली”, असेही कोहलीने नमूद केले.