Smriti Mandhana Fastest Century: स्मृती मन्धानाच्या विक्रमी वेगवान शतकाच्या बळावर भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा वनडे सामना जिकंला. तब्बल १८ वर्षांनंतर भारतीय संघाने घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना जिंकण्याची किमया साधली. २००७ मध्ये भारतीय संघाने घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाला नमवलं होतं. स्मृतीच्या तडाखेबंद शतकाच्या बळावर भारतीय संघाने २९२ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलियाला १९० धावाच करता आल्या. भारतीय संघाने १०२ धावांच्या फरकाने हा सामना जिंकला.
प्रथम फलंदाजी करत असताना भारतीय क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मन्धानाने मोठा विक्रम केला आहे. मन्धानाने ऑस्ट्रेलियाच्या संघाविरोधात सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा विक्रम केला आहे. विशेष म्हणजे, याचवर्षी राजकोट येथे आयर्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात स्मृती मन्धानाने ७० चेंडूत शतक ठोकले होते.
चंदीगढ येथील महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात स्मृती मन्धानाने आजच्या सामन्यात ७७ चेंडूत शतक ठोकण्याची किमया साधली. तर एकूण सामन्यात तिने ९१ चेंडूत ११७ धावा केल्या. या खेळीत १४ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. आजच्या शतकानंतर डावखुऱ्या मन्धानाने आपल्या कारकिर्दीतील १२ वे एकदिवसीय शतक पूर्ण केले.
आजच्या शतकामुळे स्मृती मन्धानाने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. या वर्षात तिसरे एकदिवसीय सामन्यातील शतक झळकविल्यामुळे लागोपाठ दुसऱ्या वर्षी तीन किंवा त्यापेक्षा अधिक शतक झळकविण्याचा विक्रम मन्धानाने आपल्या नावावर केला आहे. यापूर्वी २०२४ मध्येही तिने तीन शतक केले होते.
महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकविणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आता संयुक्तपणे मन्धाना तिसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडची फलंदाज टॅमी ब्यूमोंट (१२ शतके) हीची बरोबरी तिने केली आहे. महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम ऑस्ट्रेलियाची माजी कर्णधार मेग लॅनिंग हिच्या नावावार आहे. तिने १५ शतके झळकवली आहेत. तर न्यूझीलंडची क्रिकेटपटू सुझी बेट्सने १३ शतके केलेली आहेत.
ऑस्ट्रेलियाविरोधातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करत असताना भारतीय महिला फलंदाजांनी ४९.५ षटकात सर्वबाद २९२ धावा केल्या. स्मृती मन्धानाच्या (११७) खेळीसह दीप्ती शर्मा (४०), रिचा घोष (२९), स्नेह राणा (२४) आणि प्रतीका रावल (२५) यांनीही आपल्यापरीने योगदान दिले.
भारतीय संघाच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाने शरणागती पत्करली. अनाबेल सदरलँडने ४५ तर एलिसा पेरीने ४४ धावांची खेळी केली. क्रांती गौडने ३ तर दीप्ती शर्माने २ विकेट्स पटकावल्या. स्मृतीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.