व्ही. आर. रघुनाथ आणि मनदीप सिंगने केलेले गोल तसेच गोलरक्षक श्रीजेशच्या सुरेख कामगिरीमुळे भारताने यजमान मलेशियावर २-० असा विजय नोंदवित आशिया चषक हॉकी स्पर्धेत अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीतील प्रवेशाबरोबरच भारताने विश्वचषक स्पर्धेचे तिकीटही जवळपास निश्चित केले आहे. आता विजेतेपदासाठी भारताला दक्षिण कोरियाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
सुलतान अझलन शाह स्टेडियमवर रंगलेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात दक्षिण कोरियाने पाकिस्तानचा २-१ असा पराभव केला. पाकिस्तानचा हा पराभव भारताच्या पथ्यावर पडला. त्यामुळे भारत आणि मलेशियाचे विश्वचषकातील स्थान पक्के झाले. मात्र त्यावर नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या ओशियाना चषकानंतर शिक्कामोर्तब होणार आहे. विश्वचषक स्पर्धेला १९७१मध्ये सुरुवात झाल्यानंतर पाकिस्तान पहिल्यांदाच या स्पर्धेसाठी पात्र ठरला नाही.
अतिशय चुरशीने झालेल्या या सामन्यात भारताने सुरुवातीलाच गोलाची भर घातली. व्ही. आर. रघुनाथने ८व्या मिनिटालाच पेनल्टी कॉर्नरद्वारा गोल करत स्पर्धेतील सातव्या गोलाची नोंद केली. उत्तरार्धात सामन्याच्या ६०व्या मिनिटाला रमणदीप सिंगने दिलेल्या पासवर मनदीप सिंगने गोल करत भारताला २-० असा विजय मिळवून दिला. श्रीजेश याने केलेल्या अभेद्य गोलरक्षणापुढे मलेशियाच्या अनेक संधी वाया गेल्या. त्यांना मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर मारले गेलेले फटकेही श्रीजेशने अप्रतिमपणे अडवले.
स्थानिक अनुकूल वातावरण व घरच्या प्रेक्षकांचा पाठिंबा या जमेच्या बाजू असूनही मलेशियाच्या खेळाडूंवर खूपच दडपण होते. भारतीय हॉकीपटूंनी सुरेख समन्वयाचे प्रदर्शन घडवत सुरुवातीपासून सामन्यावर नियंत्रण गाजवले. आठव्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचा फायदा उठवत रघुनाथने भारताचे खाते उघडले.
दुसऱ्या सत्रात मलेशियाने सातत्याने आक्रमक चाली रचत भारतावर दडपण आणण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय खेळाडूंनी बचावाबरोबरच आक्रमणाच्या कोणत्याही संधी दवडल्या नाहीत. मलेशियाला दुसऱ्या सत्रात चार पेनल्टी कॉर्नर मिळाले, मात्र त्यांचे हे प्रयत्न भारताच्या श्रीजेशने हाणून पाडले. रमणदीपने ६०व्या मिनिटाला चाल रचत मलेशियाच्या गोलरक्षकाला चकवत चेंडू मनदीपकडे तटविला. त्याने कोणतीही चूक न करता चेंडू गोलजाळ्यात ढकलून भारताच्या विजयावर मोहोर उमटवली.

८वे मिनिट
व्ही. आर. रघुनाथ
६०वे मिनिट
मनदीप सिंग