‘‘यष्टीची उंची सहा इंचाने अधिक असती, तर सचिन तेंडुलकरला निश्चितच बाद ठरवता आले असते!’’.. अशी खिजवणारी टिप्पणी भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी १८ वर्षांपूर्वी केली होती. १९९९च्या अॅडलेड कसोटीमधील ती घटना आजही क्रिकेटविश्वात अधोरेखित केली जाते. ग्लेन मॅकग्राच्या बाऊन्सरवर सचिनला भोपळाही फोडता आला नव्हता आणि पायचीत होऊन तो माघारी परतला. हा चेंडू चुकवण्याठी खाली झुकलेल्या सचिनच्या खांद्यावर आदळला होता. परंतु ऑस्ट्रेलियाच्या क्षेत्ररक्षकांनी दाद मागितली आणि पंच डॅरेल हार्पर यांचे बोट क्षणार्धात आकाशाकडे गेले. सचिनला काय घडतेय, याचा अंदाज येण्याच्या आत हा धक्का बसला. समस्त क्रिकेटजगतात या घटनेबाबत आश्चर्य, नाराजी आणि टीकेचे भाव होते. क्रिकेटमधील खेळभावनेविषयीही चर्वितचर्वण झाले. काही क्रिकेटतज्ज्ञांनी तर नियमांची सखोल मीमांसा केली आणि सचिन बाद नसल्याचे विचार मांडले. काहींनी तर यापुढे जाऊन सचिन ‘पायचीत’ नव्हे, तर ‘खांदाचीत’ झाल्याचे नमूद केले.
या वादामुळे एक चांगली घटना क्रिकेटमध्ये घडली; ती म्हणजे २००२पासून कसोटी मालिकेकरिता त्रयस्थ पंचांची संकल्पना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अमलात आणली, तर दुसरी म्हणजे याच घटनेपासून भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेचे महत्त्वही वाढले. सध्या पीटर हँड्सकोम्बच्या सल्ल्यानुसार कर्णधार स्टीव्ह स्मिथने पायचीत असल्याच्या पंचांच्या निर्णयाविरोधात ‘डीआरएस’द्वारे दाद मागण्यासाठी चक्क ड्रेसिंग रूमची मदत घेण्याचा प्रयत्न आणि विराट कोहलीशी झालेली हमरातुमरी हा वाद ताजा आहे. दोन्ही क्रिकेट संघटनांनी वाद मिटवून समेट घडवला असला तरी त्याचे निखारे हे जाणवणारच. ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यातील अॅशेस किंवा भारत-पाकिस्तान या परंपरागत प्रतिस्पध्र्यामधील रणधुमाळीची उत्सुकता गेल्या काही वर्षांत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतही दिसून येत आहे. याशिवाय मैदानातील अनेक प्रसंग भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेचे क्रिकेटमधील वेगळे स्थान निर्माण करण्यासाठी पूरक ठरत आहेत.
सचिनच्या घटनेआधी १९८१ मध्ये गावस्कर यांचे मेलबर्न मैदानावरील आंदोलन गाजले होते, ज्याची आता मात्र त्यांना खंत वाटते. गावस्कर ७० धावांवर असताना डेनिस लिलीने त्यांना पायचीत केले. मात्र चेंडू बॅटला लागून मग पायाला लागल्याची खात्री असल्यामुळे त्यांनी मैदान न सोडण्याचा निर्णय घेतला. काही वेळाने मैदान सोडताना डोके हलवून मी बाद नाही, असा इशारा त्यांनी केला. मात्र सोबतीला असलेल्या चेतन चौहान यांनाही त्यांनी मैदान सोडण्यास सांगितले. दोघेही सीमारेषेच्या दिशेने जात असताना व्यवस्थापक शाहीद दुराणी यांनी मध्यस्थी करून चौहान यांना थांबवले. त्यामुळे भारताचा पराभव टळला. जर भारताने ते पाऊल उचलले असते, तर कदाचित संघावर बंदीसुद्धा आली असती.
हरभजन सिंग-अॅन्ड्रय़ू सायमंड्स यांच्या वादावर आधारित ‘मंकीगेट’ प्रकरण तर आख्यायिका झाली आहे. २ ते ६ जानेवारी २००८ दरम्यान सिडनीला झालेल्या त्या ऐतिहासिक कसोटी सामन्याचे कवित्व अद्याप ओसरलेले नाही. हरभजनने आपल्यावर वर्णभेदात्मक शेरेबाजी करीत ‘माकड’ संबोधल्याचा आरोप सायमंड्सने केला होता. सामनाधिकारी माइक प्रॉक्टर यांनी हरभजनवर तीन सामन्यांची बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला. परंतु भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने खंबीर भूमिका घेत त्याचा निषेध केला आणि दौरा अध्र्यावर सोडण्याची धमकी दिली. मग हा बंदीचा निर्णय रद्द करीत अर्वाच्य भाषा वापरल्याबद्दल हरभजनच्या मानधनातील ५० टक्के रक्कम कापण्यात आली. या प्रकरणाच्या सुनावणीत सचिनची जबानी महत्त्वाची ठरली होती. १९३२मध्ये ‘बॉडीलाइन’ मालिकेमुळे ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यात राजनैतिक संबंध दुरावले होते. तशाच प्रकारची ठिणगी या घटनेमुळे पडली होती. बीसीसीआयने खेळाडूंना मायदेशात आणण्यासाठी खासगी विमानही निश्चित केले होते. परंतु सुदैवाने हे प्रकरण निकालात निघाले. ही कसोटी पंच स्टीव्ह बकनर यांच्या वादग्रस्त निर्णयांमुळेही गाजली. कारण बकनर यांच्या चुकीच्या निर्णयांमुळेच सामन्याला कलाटणी मिळाली. रिकी पॉन्टिंगच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया संघाने विजयाकरिता साम-दाम-दंड-भेद नीतीचा या सामन्यात वापर केला. अखेरच्या दिवशी तासाभराचा अवधी असतानाच मायकेल क्लार्कने पाच चेंडूंत ३ बळी घेत ही कसोटी कांगारूंना १२२ धावांनी जिंकून दिली. परंतु ‘जिंकण्यासाठी काहीही..’ या ऑस्ट्रेलियाच्या नीतिमत्तेवर कडाडून टीका झाली.
२००४मध्ये नागपूरमधील तिसरी कसोटी वाचवणे भारताला आवश्यक होते. परंतु पहिल्या दिवशी सकाळीच कर्णधार सौरव गांगुलीने दुखापतीमुळे माघार घेतल्याचा निर्णय जाहीर केला. पण या मागची खरी बातमी निराळीच आहे. भारतीय गोलंदाजांना खेळपट्टीकडून मदत मिळावी, यासाठी गांगुलीने क्युरेटरला सूचना केली होती. ती त्याने धुडकावल्यामुळे गांगुलीने या सामन्यातून माघार घेतल्याचे म्हटले जात होते. गांगुलीच्या या आततायी निर्णयामुळे भारताने ही कसोटी मोठय़ा फरकाने तर गमावलीच, शिवाय मालिकेवरही ऑस्ट्रेलियाने कब्जा केला. तब्बल ३५ वर्षांनी ऑस्ट्रेलियाला भारतीय भूमीवर कसोटी मालिका जिंकता आली होती. मग ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडनने आपल्या आत्मचरित्रात ‘हिरवी रणनीती’ असे संबोधत गांगुलीवर तोंडसुख घेतले आहे. पण याच गांगुलीने २००१मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कोलकाता कसोटीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह वॉला नाणेफेकीसाठी ताटकळत ठेवले होते. आपल्याला नाणेफेकीसाठी घालून जायचा ब्लेझर सापडत नव्हता म्हणून विलंब झाल्याची गांगुलीने नंतर सारवासारव केली. वॉनेही आपल्या ‘आऊट ऑफ माय कम्फर्ट झोन’ या आत्मचरित्रात त्या घटनेचा उल्लेख केला आहे. नाणेफेकीसाठी विलंब करीत गांगुलीने उद्दामपणा दाखवला, असे वॉने आवर्जून नमूद केले आहे.
‘मंकीगेट’नंतर चार वर्षांनी ‘फिंगरगेट’ नाटय़ घडले. आक्रमक विराटने त्यावेळी सिडनीतील क्रिकेटरसिकांना मधले बोट दाखवले होते. कारण क्षेत्ररक्षण करणाऱ्या विराटबाबत त्यांनी आक्षेपार्हरीत्या डिवचायला सुरुवात केली होती. विराटचे कृत्य टीव्ही कॅमेऱ्याने रंगेहाथ पकडल्यामुळे त्याला जबर दंडाची शिक्षा झाली. मात्र त्यानंतर समाजमाध्यमांवर आपला राग व्यक्त करताना तो म्हणाला की, ‘‘जर कुणी तुमच्या आई-बहिणीविषयी वाईट शब्दप्रयोग करू लागले, तर ते तुम्ही कसे काय ऐकू शकाल?’’
स्लेजिंग म्हणजेच डिवचणे हे ऑस्ट्रेलियाचे प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध वापरण्याचे हुकमी अस्त्र. मात्र आता त्याची मक्तेदारी फक्त ऑस्ट्रेलियाकडे राहिलेली नाही. भारतीय खेळाडूसुद्धा हे अस्त्र प्रभावीपणे वापरू लागले आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये घडणाऱ्या वादग्रस्त घटना, आत्मचरित्रांमध्ये दिग्गज क्रिकेटपटूंनी घटनेचा घेतलेला वेध आदी सर्व गोष्टींमुळे भारत-ऑस्ट्रेलिया लढतीचा आलेख मात्र कमालीचा उंचावला आहे. गेल्या काही वर्षांतील प्रेक्षकसंख्येचा आढावा घेतल्यास या आकडेवारीने अॅशेसलाही मागे टाकले असून, भारत-पाकिस्तान लढतींनाही ते आव्हानात्मक ठरू पाहते आहे. त्यामुळे तूर्तास, चर्चा तर होणारच!
prashant.keni@expressindia.com
