scorecardresearch

भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका: पात्रतेची अंतिम संधी!

India vs Australia Test Seriesजागतिक कसोटी अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम सामन्यासाठी पात्रता मिळवण्यास भारतीय संघ उत्सुक असून त्यासाठी गुरुवारपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात त्यांना विजय महत्त्वाचा आहे.

virat kohli
( विराट कोहली )

आजपासून ऑस्ट्रेलियाविरुद्धची चौथी कसोटी; भारताच्या फलंदाजांवर लक्ष

पीटीआय, अहमदाबाद

India vs Australia Test Seriesजागतिक कसोटी अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम सामन्यासाठी पात्रता मिळवण्यास भारतीय संघ उत्सुक असून त्यासाठी गुरुवारपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात त्यांना विजय महत्त्वाचा आहे. भारतीय फलंदाजांना पहिल्या तीन सामन्यांत अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यामुळे त्यांच्या कामगिरीत सुधारणा होते का, याकडेही चाहत्यांचे लक्ष असेल.

भारतासाठी समीकरण सोपे आहे. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा अखेरचा कसोटी सामना जिंकत मालिकेत ३-१ अशी सरशी साधल्यास ते ‘डब्ल्यूटीसी’ स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरतील. मात्र, हा सामना अनिर्णित राहिला किंवा भारताचा पराभव झाल्यास त्यांना श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेच्या निर्णयावर अवलंबून राहावे लागेल. ऑस्ट्रेलियाचा संघ ‘डब्ल्यूटीसी’ स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी आधीच पात्र ठरला असून त्यांच्यासमोर आव्हान उपस्थित करण्यासाठी भारत आणि श्रीलंका या संघांमध्ये चुरस आहे.

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना खेळला जाणार आहे. गुरुवारी, सामन्याच्या पहिल्या दिवशी एक लाखहून अधिक प्रेक्षकांची स्टेडियममध्ये उपस्थिती अपेक्षित आहे. तसेच पंतप्रधान मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अॅन्थनी अल्बानीसी हेसुद्धा सामना पाहण्यासाठी उपस्थित असतील. त्यामुळे या सामन्याचे महत्त्व अधिकच वाढले आहे.

भारताने या मालिकेची अप्रतिम सुरुवात करताना पहिले दोनही कसोटी सामने तीन दिवसांच्या आतच जिंकले होते. मात्र, इंदूर येथील तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दमदार पुनरागमन करताना विजय मिळवला. त्यामुळे सध्या भारताकडे २-१ अशी आघाडी असली, तरी चौथ्या कसोटीत विजय मिळवण्यासाठी त्यांना कामगिरीत सुधारणा करावी लागणार आहे. दुसरीकडे, स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाचा सलग दुसऱ्या विजयासह मालिका २-२ अशा बरोबरीत संपवण्याचा प्रयत्न असेल.

फिरकी त्रिकुटावर भिस्त
पहिल्या कसोटीतील पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने अनुभवी नेथन लायनसह ऑफ-स्पिनर टॉफ मर्फी आणि डावखुरा मॅट कुनमन या तीन फिरकीपटूंसह खेळण्याचा निर्णय घेतला. तिसऱ्या कसोटीत या तिघांनीही प्रभावी मारा केला.लायनने सामन्यात एकूण ११ बळी मिळवत ऑस्ट्रेलियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. अहमदाबाद कसोटीतही या तिघांवर संघाची भिस्त असेल.

कोहलीला सूर गवसणार?
बॉर्डर-गावस्कर मालिकेतील पहिल्या तीनही सामन्यांच्या खेळपट्टय़ा या फिरकीला अनुकूल होत्या. त्यामुळे दोन्ही संघांतील फलंदाजांना मोठय़ा खेळी करता आलेल्या नाहीत. त्यातही तारांकित फलंदाज विराट कोहलीची कामगिरी हा भारतासाठी चिंतेचा विषय आहे. कोहलीला गेल्या १५ कसोटी डावांत एकही अर्धशतक करता आलेले नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील तीन सामन्यांत त्याने केवळ १११ धावा केल्या आहेत. तसेच तो फिरकीविरुद्ध चाचपडताना दिसतो आहे. त्यामुळे कोहलीला सूर गवसेल अशी भारतीय संघाला आशा असेल. तसेच कर्णधार रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर यांनी खेळपट्टीवर अधिक वेळ घालवणे गरजेचे आहे.

वेळ : सकाळी ९.३० वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस १, १ हिंदी (संबंधित एचडी वाहिन्या)

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-03-2023 at 03:21 IST
ताज्या बातम्या