मस्कत : कनिष्ठ गटाच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत उपांत्य फेरी निश्चित केलेल्या भारतीय संघाने रविवारी कोरियाचा ८-१ असा धुव्वा उडवला. भारतीय संघ ‘अ’ गटातून सर्व सामने जिंकून अव्वल स्थानावर राहिला.

अर्शदीपने नवव्या, ४४ आणि ६०व्या मिनिटाला गोल केले. अराइजित सिंग हुंडालने तिसऱ्या आणि ३७व्या, तर गुरज्योत सिंगने ११व्या, रोसन कुजूरने २७व्या आणि रोहितने ३०व्या मिनिटाला गोल केले. कोरियाचा एकमेव गोल किम ताहेयॉनने केला.

या विजयाने भारताचे १२ गुण झाले. ‘अ’ गटातून जपाननेही उपात्य फेरी गाठली. त्यांचे नऊ गुणांसह दुसरे स्थान आहे. स्पर्धेत मंगळवारी होणाऱ्या उपांत्य लढतीत भारताची गाठ मलेशियाशी पडणार आहे. मलेशिया ‘ब’ गटातून दुसऱ्या, तर पाकिस्तान अव्वल स्थानावर आहे. पुढील वर्षी भारतात होणाऱ्या कुमार विश्वचषक स्पर्धेसाठी या स्पर्धेकडे पात्रता स्पर्धा म्हणून बघितले जात आहे. आशियाई स्पर्धेतील पहिले सहा संघ विश्वचषकासाठी पात्र ठरणार आहेत. अर्थात, यजमान या नात्याने भारताचे स्पर्धेतील स्थान निश्चित असल्यामुळे आता या स्पर्धेत सातव्या स्थानावरील संघाला संधी मिळणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.