अ‍ॅडलेड कसोटी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर भारतीय संघावर सध्या चहुबाजूंनी टीका होते आहे. दुसऱ्या दिवसाअखेरीस सामन्यावर वर्चस्व मिळवणाऱ्या भारतीय संघाची तिसऱ्या दिवसाच्या खेळात दाणादाण उडाली. त्यातच कर्णधार विराट कोहली पहिल्या सामन्यानंतर भारतात परतणार असल्यामुळे संघाची चिंता आणखी वाढली आहे. पृथ्वी शॉची सुमार कामगिरी आणि मोहम्मद शमीची दुखापत यामुळे या चिंतेत आणखी भर पडली आहे. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक ब्रॅड हॅडीनने टीम इंडियासाठी आता कसोटी मालिकेत पुनरागमन करणं अशक्य असल्याचं म्हटलंय.

“भारतीय संघ पहिल्या कसोटीत झालेल्या पराभवामधून सावरु शकले असं वाटत नाही. अ‍ॅडलेडमध्ये कसोटी सामना जिंकण्याची भारतीय संघाकडे चांगली संधी होती. अ‍ॅडलेडची खेळपट्टी भारतीय गोलंदाजांसाठी पोषक होती, त्यांच्याकडे धावा ही होत्या, पण आता ते पुनरागमन करु शकणार नाहीत. पुढे भारत ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियाचा सामना करेल, तिकडे कांगारुंनी एकही सामना गमावलेला नाही. पुढील दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाला पोषक वातावरण नक्कीच आहे, पण मालिकेत पुनरागमन करणं टीम इंडियासाठी अशक्य आहे.” हॅटिन SEN Radio ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

२०१८-१९ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी मालिका जिंकत भारतीय संघाने इतिहास रचला होता. मात्र यंदाच्या मालिकेत भारतीय संघासमोर कांगारुंचं तगडं आव्हान आहे. ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत सध्या ०-१ अशा पिछाडीवर आहे. २६ डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये बॉक्सिंग डे कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे भारतीय संघाचं नेतृत्व करेल. त्यामुळे या सामन्यात भारतीय संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्व चाहत्यांचं लक्ष लागलेलं आहे.

अवश्य वाचा – दुसऱ्या कसोटीआधी वासिम जाफरचा अजिंक्य रहाणेला खास संदेश, पाहा…तुम्हाला कळतोय का याचा अर्थ