एल. बोम्बाल्या देवी, दीपिका कुमारी आणि रिमिल बुरिउली या भारताच्या महिला रिकव्र्ह संघाने विश्व अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेत पुन्हा एकदा सुरेख कामगिरी करून सुवर्णपदकाची कमाई केली. व्रोकलाव येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने अव्वल मानांकित कोरियाचा पाडाव केला. भारतीय महिला संघाचे विश्व अजिंक्यपद स्पर्धेतील हे सलग दुसरे सुवर्णपदक ठरले आहे.
भारताच्या संघाने कोरियाचा २१९-२१५ असा पराभव करून सुवर्णपदकाला गवसणी घातली. यून ओक-ही, की बो बे आणि जू ह्यून जंग यांच्या कोरिया संघाची झुंज चार गुणांनी कमी पडली. डेन्मार्कने रशियावर २१०-१९४ अशी सहज मात करून कांस्यपदक पटकावले.
कोरियाने बाद फेरीत अमेरिका, इटली आणि रशियाविरुद्ध २२२ पेक्षा जास्त गुणांची कमाई केली होती. त्याउलट भारताने मेक्सिको, डेन्मार्क आणि इंडोनेशियाचा पराभव करून अंतिम फेरीत मजल मारली होती. तिसऱ्या फेरीनंतर भारत आणि कोरियात १६३-१६३ अशी बरोबरी होती. मात्र त्यानंतर वारा वाहण्यास सुरुवात झाल्यानंतर सामन्याचे पारडे भारताच्या बाजुने झुकले. त्यानंतर कोरियाने ६-९-९ असे गुण मिळवले. भारताने मात्र तिन्ही प्रयत्नांत दहा गुणांची कमाई केली. अखेरच्या तिन प्रयत्नांत कोरियाने ९-८-१० असे गुण प्राप्त केले. भारताने चोख प्रत्युत्तर देत १०-१०-७ असे गुण मिळवून चौथी फेरी ५६-५२ अशा फरकाने जिंकून सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. विश्व अजिंक्यपद स्पर्धेतील चार फेऱ्यांमध्ये दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्यपदकाची कमाई केल्यामुळे दीपिका कुमारी विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरली आहे. सलग दुसऱ्यांदा तिने या स्पर्धेसाठी पात्र होण्याचा मान पटकावला आहे. गेल्या वेळी तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते.