वृत्तसंस्था, बर्मिगहॅम : रवींद्र जडेजाच्या (२९ चेंडूंत नाबाद ४६ धावा) फटकेबाजीनंतर गोलंदाजांनी केलेल्या सांघिक कामगिरीच्या जोरावर भारताने शनिवारी दुसऱ्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात इंग्लंडवर ४९ धावांनी मात केली. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी मिळवली आहे. या मालिकेतील तिसरा सामना रविवारी खेळवण्यात येईल.

बर्मिगहॅम येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने दिलेल्या १७१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ १७ षटकांत १२१ धावांत गारद झाला. भुवनेश्वर कुमारने वैयक्तिक पहिल्या दोन षटकांत जेसन रॉय (०) आणि कर्णधार जोस बटलर (४) यांना माघारी पाठवले. यातून इंग्लंडचा संघ अखेपर्यंत सावरू शकला नाही. मोईल अली (२१ चेंडूंत ३५) आणि डेव्हिड विली (२२ चेंडूंत नाबाद ३३) यांचा अपवाद वगळता इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला २० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. भारताकडून भुवनेश्वर (३/१५), जसप्रित बुमरा (२/१०), यजुवेंद्र चहल (२/१०), हार्दिक पंडय़ा (१/२९) आणि हर्षल पटेल (१/३४) यांनी बळी मिळवले.

तत्पूर्वी, भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद १७० अशी धावसंख्या उभारली. कर्णधार रोहित शर्मा (२० चेंडूंत ३१) आणि ऋषभ पंत (१५ चेंडूंत २६) या सलामीवीरांनी भारताच्या डावाची आक्रमक सुरुवात केली. त्यांनी ४.५ षटकांतच ४९ धावांची सलामी दिल्यावर रोहितला पदार्पणवीर रिचर्ड ग्लीसनने बाद केले. ग्लीसननेच मग पंत आणि विराट कोहली (१) यांनाही माघारी पाठवले. मात्र, जडेजाने अखेरच्या षटकांत पाच चौकारांच्या मदतीने नाबाद ४६ धावा करत भारताला सावरले.

संक्षिप्त धावफलक

भारत : २० षटकांत ८ बाद १७० (रवींद्र जडेजा नाबाद ४६, रोहित शर्मा ३१; ख्रिस जॉर्डन ४/२७, रिचर्ड ग्लीसन ३/१५) विजयी वि. इंग्लंड : १७ षटकांत सर्वबाद १२१ (मोईन अली ३५; भुवनेश्वर कुमार ३/१५, जसप्रित बुमरा २/१०, यजुर्वेद्र चहल २/१०)

  •   सामनावीर : भुवनेश्वर कुमार

तिसरा ट्वेन्टी-२० सामना

  •   वेळ :  आज सायं. ७ वा.
  •   थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स, टेन ३ (संबंधित एचडी वाहिन्या)