अन्वय सावंत, लोकसत्ता

मुंबई : भारतासाठी यंदाची बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा संमिश्र यश देणारी ठरली. डी. गुकेश आणि दिव्या देशमुख यांनी चमकदार कामगिरी केली, तर विदित गुजराथी आणि कोनेरू हम्पी यांनी अपेक्षाभंग केला.

चेन्नईजवळील महाबलीपूरम येथे झालेल्या या स्पर्धेत यजमान भारताला खुल्या आणि महिला या दोन्ही विभागांत प्रत्येकी तीन संघ खेळवण्याची संधी मिळाली. यापैकी खुल्या विभागात भारताच्या ‘ब’ संघाने आणि महिला विभागात ‘अ’ संघाने कांस्यपदके पटकावली. परंतु अन्य संघांना पदकांपर्यंतची मजल मारता आली नाही. भारताच्या काही खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली, तर काही खेळाडूंकडून अपेक्षेप्रमाणे कामगिरी झाली नाही.

भारतीय ‘ब’ संघाच्या गुकेशने सुरुवातीचे आठपैकी आठ सामने जिंकण्याचा पराक्रम केला होता. त्यानंतरच्या तीन फेऱ्यांमध्ये त्याचे दोन सामने बरोबरीत सुटले, तर त्याने एक सामना गमावला. त्याच्या कामगिरीच्या बळावर ‘ब’ संघाला खुल्या विभागात तिसरे स्थान मिळवता आले. तसेच नागपूरची १६ वर्षीय खेळाडू दिव्यानेही प्रभावित करताना भारताच्या महिला ‘ब’ संघाकडून नऊपैकी सहा लढती जिंकल्या आणि दोन लढती बरोबरीत सोडवल्या. 

अनुभवी विदित, पी. हरिकृष्णा आणि हम्पी यांनी मात्र निराशा केली. गरोदर असलेल्या द्रोणावल्ली हरिकाने या स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला. मात्र, तिला लौकिकाला साजेसा खेळ करण्यात अपयश आले. तिचे सातही सामने बरोबरीत संपले.