पुढील वर्षी होणाऱ्या विश्व अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत स्थान पक्के करण्याच्या दृष्टीने भारताने आशिया चषक हॉकी स्पर्धेत दणक्यात सुरुवात केली. मात्र आता भारताला सोमवारी होणाऱ्या सामन्यात गतविजेत्या दक्षिण कोरियाच्या अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.
भारताने सलामीच्या सामन्यात ओमानचा ८-० असा धुव्वा उडवून झकास सलामी नोंदवली. मात्र आठ देशांच्या या स्पर्धेत आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी सज्ज असलेल्या दक्षिण कोरियाविरुद्ध विजय मिळवणे ११व्या क्रमांकावरील भारताला सोपे जाणार नाही. याआधीच विश्व अजिंक्यपद स्पर्धेत स्थान मिळवणारा कोरिया संघ भारत आणि पाकिस्तानचे स्वप्न उधळून लावण्यासाठी सज्ज आहे. आठ वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारा भारत आणि शेजारील पाकिस्तान संघासमोर करो या मरो अशी स्थिती येऊन ठेपली आहे. विश्व अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र होण्याची ही अखेरची संधी दोन्ही देशांना मिळाली आहे. भारत आणि पाकिस्तानचे प्रयत्न अपयशी ठरल्यास, त्यांना १९७१नंतर प्रथमच विश्व अजिंक्यपद स्पर्धेत खेळता येणार नाही.
दानिश मुज्तबा, एस. व्ही. सुनील, गुरविंदर सिंग चंडी आणि आकाशदीप सिंग या दुखापतग्रस्त खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारताच्या आघाडीच्या फळीची जबाबदारी मनदीप सिंग, नितीन थिमय्या, मलक सिंग, रमणदीप सिंग आणि निकीन थिमय्या यांच्यावर आहे. मनदीपने ओमानविरुद्ध हॅट्ट्रिक साजरी केली तर मलक आणि रमणदीप यांनी प्रत्येकी एक गोल करून भारताच्या विजयात मोलाचा हातभार लावला. ओमानविरुद्ध भारताने पाच मैदानी गोल लगावले. कोरियाविरुद्धही भारत तोच संघ उतरवणार
आहे.
कोरियाविरुद्ध व्ही. आर. रघुनाथ, रुपिंदरपाल सिंग, अमित रोहिदास, कोथाजित सिंग, बीरेंद्र लाकरा आणि गुरमेल सिंग या भारताच्या बचावफळीवर दबाव येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर गोलरक्षक पी. आर. श्रीजेशसमोर कोरियाच्या आक्रमकवीरांना रोखण्याचे आव्हान असणार आहे. दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत ६८ सामने झाले असून कोरियाने ३० वेळा तर भारताने २६ वेळा विजय मिळवला आहे. १२ सामने बरोबरीत सुटले आहेत. मात्र आशिया चषकातील आठ सामन्यांपैकी पाच सामने भारताने जिंकले आहेत.