भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १४ जानेवारीपासून एकदिवसीय मालिका खेळण्यात येणार आहे. ३ सामन्यांच्या या एकदिवसीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व अॅरोन फिंच याच्याकडे आहे. ऑस्ट्रेलियाचा उदयोन्मुख खेळाडू मार्नस लाबूशेन याने भारतात भारताविरूद्ध खेळणं आव्हानात्मक असल्याचे म्हटले असतानाच आस्ट्रेलियाचा एकदिवसीय संघाचा कर्णधार अॅरोन फिंचने मात्र भारताला भारतात सहज पराभूत करू असा विश्वास व्यक्त केला होता. या दरम्यान ऑस्ट्रेलियाचा डावखुरा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याने भारतीय संघासाठी आणि चाहत्यांसाठी एक संदेश दिला आहे.
डेव्हिड वॉर्नरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर विमानात बसलेला एक फोटो शेअर केला आहे. वॉ़र्नरने त्या फोटोखाली कॅप्शन लिहीले आहे, “भारतीयांनो, आम्ही येत आहोत. ही ३ सामन्यांची मालिका ‘लय भारी’ होणार आहे. मी आमच्या सगळ्या भारतीय चाहत्यांना भेटण्यासाठी उत्सुक आहे.”
पाहा पोस्ट –
View this post on Instagram
कर्णधार अॅरोन फिंच म्हणाला…
“भारतात भारतीय संघाविरूद्ध खेळताना खूप आव्हानांचा सामना करावा लागतो. पण आम्ही नुकतेच न्यूझीलंड विरूद्धच्या कसोटी मालिकेत निर्भेळ यश मिळवले आहे. त्यामुळे आमच्या संघातील खेळाडूंचा आत्मविश्वास दुणावला आहे. भारतीय संघाविरूद्ध भारतात खेळण्यासाठी आम्ही काही योजना आखल्या आहेत. भारताला पराभवाचं पाणी पाजण्यासाठी आमच्याकडे महत्त्वाचे खेळाडू आहेत. आम्ही त्या योजना अंमलात आणू आणि आम्ही टीम इंडियाला सहज धूळ चारू”, असा विश्वास अॅरोन फिंचने व्यक्त केला.
न्यूझीलंडच्या संघाला हैराण करणारा लाबूशेन भारत दौऱ्याबाबत म्हणतो…
“जेव्हा तुम्ही भारतात भारताविरूद्ध खेळता, तेव्हा ती सर्वात कठीण क्रिकेट मालिका असते कारण भारतीय संघ हा खूप आव्हानात्मक खेळ खेळण्यासाठी ओळखला जातो. भारतीय संघात प्रतिभावंत गोलंदाज आणि फलंदाज आहेत. त्यामुळे भारतातील आगामी मालिका आव्हानात्मक असणार यात वादच नाही. पण खेळाडू म्हणून स्वत:ला सिद्ध करायचे असेल तर त्यासाठी तोडीचा प्रतिस्पर्धी संघ आणि प्रतिकूल वातावरण असायला हवे. अशा परिस्थितीतच क्रिकेट खेळण्यासाठी तुम्ही किती पात्र आहात त्याची परीक्षा होते. आणि भारताविरूद्ध भारतात खेळण्यापेक्षा काहीही नाही”, असे मार्नस लाबूशेनने क्रिकेट ऑस्ट्रेलिया वेबसाईटच्या मुलाखतीत सांगितलं.
