आशियाई चॅलेंज फुटबॉल स्पर्धेच्या मुख्य फेरीत स्थान मिळविण्याच्या भारताच्या आशांना धक्का बसला आहे. म्यानमार संघाने सोई मिनओ याच्या एकमेव गोलाच्या आधारे भारताला १-० असे पराभूत केले. त्यामुळे भारताला या स्पर्धेसाठी पात्र होण्याकरिता प्रतीक्षा करावी लागणार आहे.
 मिनओने सामन्याच्या ७५व्या मिनिटाला पेई फिओआंग याच्या पासवर हा गोल केला. या स्पर्धेच्या मुख्य फेरीत स्थान मिळविण्याचे भारताचे भवितव्य अन्य गटातील सामन्यांच्या निकालांवर अवलंबून आहे. भारताने आपल्या गटात तैवान व गुआम यांच्यावर मात केली होती. यजमान म्यानमारविरुद्ध त्यांनी जिद्दीने खेळ केला. तथापि गोल करण्याच्या अनेक संधी दवडल्या गेल्यामुळे भारताला हा सामना गमवावा लागला. २६व्या मिनिटाला क्लिफर्ड मिरांडाने गोल करण्याची हुकमी संधी वाया घालविली. कर्णधार सुनील छेत्री याला फारसा सूर गवसला नाही. शेवटच्या मिनिटाला रॉबिन सिंग व इझूमी अराटा यांनी केलेले प्रयत्नही अपुरे ठरले.