विश्वचषकाची रंगीत तालीम असलेल्या सराव सामन्यात यजमान भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. ऑस्ट्रेलियाने दर्जेदार सांघिक खेळाचे प्रदर्शन करत विश्वचषकासाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले आणि भारताचा पाच विकेट्स राखत पराभव केला.
नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारलेल्या भारतीय संघाने ५० षटकांत २२२ धावांचीच मजल मारली. ऑस्ट्रेलियाने ५ विकेट्सच्या मोबदल्यात १२ षटके राखत सामना जिंकला. भारतातर्फे पूनम राऊत (३१) आणि थिरुश कामिनी (३०) या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली. मात्र त्यानंतर ठरावीक अंतराने विकेट्स पडल्याने भारताला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. रीमा मल्होत्रा आणि नागाराजन निरंजना या दोघींनी प्रत्येकी ३५ धावांची खेळी केल्याने भारतीय संघाने दोनशेचा टप्पा ओलांडला. ऑस्ट्रेलियातर्फे लिसा स्थळेकरने सर्वाधिक ३ बळी टिपले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. मात्र जेस कॅमेरुनने ३५ धावा करत डाव सावरला. यानंतर अ‍ॅलेक्स ब्लॅकवेलने ९ चौकारांसह ४७ धावा करत संघाच्या विजयाचा पाया रचला. कॅमेरुन बाद झाल्यानंतर कर्णधार जोडी फिल्ड्सने सामन्याची सूत्रे हाती घेतली आणि अर्धशतकी खेळी करत ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. अ‍ॅलिसा हिलीने नाबाद ३६ धावा करत तिला चांगली साथ दिली. भारतातर्फे अमिता शर्माने २ बळी घेतले.
दरम्यान ताप असल्यामुळे भारताची कर्णधार मिताली राज या सामन्यात खेळू शकली नाही मात्र तिची तब्येत ठीक असल्याचे संघव्यवस्थापनाने स्पष्ट केले. पुढच्या दिवसरात्र सामन्यात भारतीय संघाचा वेस्टइंडिजशी मुकाबला होणार आहे.
संक्षिप्त धावफलक : ५० षटकांत ८ बाद २२२ (नागाराजन निरंजना ३५, रीमा मल्होत्रा ३५, लिसा स्थळेकर ३/२९) पराभूत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ५ बाद २२३ (जोडी फिल्ड्स ५२, अलिसा हिली नाबाद ३६, अमिता शर्मा २/२६)