भारत-न्यूझीलंड क्रिकेट मालिका : भारताला आज प्रयोगाची संधी!

ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारताला उपांत्य फेरीपूर्वीच गाशा गुंडाळावा लागला; परंतु रोहित शर्मा आणि राहुल द्रविड या नव्या कर्णधार-प्रशिक्षकाच्या पर्वाचा दिमाखात प्रारंभ झाला.

न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत निर्भेळ यश संपादन करण्यासाठी यजमान उत्सुक

पहिल्या दोन सामन्यांत निर्विवाद वर्चस्व गाजवल्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध रविवारी होणाऱ्या तिसऱ्या ट्वेन्टी-२० क्रिकेट लढतीमध्ये विजय मिळवून मालिकेत निर्भेळ यश संपादन करण्याचे भारतीय संघाचे लक्ष्य आहे. या लढतीत संघबांधणीचे प्रयोग करण्याचीही भारताला संधी आहे.

ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारताला उपांत्य फेरीपूर्वीच गाशा गुंडाळावा लागला; परंतु रोहित शर्मा आणि राहुल द्रविड या नव्या कर्णधार-प्रशिक्षकाच्या पर्वाचा दिमाखात प्रारंभ झाला. पहिल्या सामन्यात सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकाच्या बळावर भारताने पाच गडी राखून अखेरच्या षटकात विजय मिळवला, तर दुसऱ्या लढतीत पदार्पणवीर हर्षल पटेलची प्रभावी गोलंदाजी आणि रोहित-के. एल. राहुल यांच्या अर्धशतकांमुळे भारताने मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. त्यामुळे आता रोहितसाठी फलदायी मानल्या जाणाऱ्या कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर भारत विजयी हॅट्ट्रिक साकारणार का, हे पाहणे रंजक ठरेल. न्यूझीलंड मात्र किमान प्रतिष्ठा राखण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल.

ऋतुराज, किशन प्रतीक्षेत

पहिल्या दोन्ही लढतींत रोहितने फलंदाजीच्या क्रमात कोणताही बदल केला नाही. मात्र आता मालिका खिशात टाकल्याने महाराष्ट्राचा ऋतुराज गायकवाड, इशान किशन यांना संधी मिळू शकते. राहुलला चार दिवसांच्या अंतरातच कसोटी मालिकेतसुद्धा खेळायचे असल्याने त्याला विश्रांती देऊन ऋतुराज सलामीला येऊ शकतो, तर ऋषभ पंतऐवजी किशनकडे यष्टिरक्षणाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. प्रदीर्घ काळाने संघात परतलेला श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर यांना मात्र आणखी एक संधी मिळू शकते.

हर्षलकडून सातत्याची अपेक्षा

‘आयपीएल’च्या १४व्या हंगामात पर्पल कॅपचा मानकरी ठरलेल्या हर्षलने दुसऱ्या सामन्यात दोन महत्त्वपूर्ण बळी मिळवले. त्यामुळे त्याच्याकडून पुन्हा त्याच कामगिरीची अपेक्षा आहे. भुवनेश्वार कुमार किंवा दीपक चहरपैकी एकाला वगळून आवेश खानला खेळवता येऊ शकते. रविचंद्रन अश्विान, अक्षर पटेल यांची फिरकी जोडी मधल्या षटकांत धावा रोखण्याचे आणि बळी मिळवण्याचे काम चोखपणे करत आहे.

गप्टिल-चॅपमनवर मदार

कर्णधार केन विल्यम्सनच्या अनुपस्थितीत मार्टिन गप्टिल, मार्क चॅपमन यांच्यावर न्यूझीलंडच्या फलंदाजीची भिस्त आहे. डॅरेल मिचेल, ग्लेन फिलिप्स यांनाही दुसऱ्या लढतीत सूर गवसला. मात्र चांगल्या सुरुवातीनंतर हाणामारीच्या षटकांत फलंदाज कामगिरी उंचावण्यात अपयशी ठरत असल्याने न्यूझीलंडला दोन्ही सामन्यांत १७० धावांचा टप्पा गाठणे जमले नाही.

गोलंदाजांवर दडपण

न्यूझीलंडला दोन्ही वेळेस दुसऱ्या डावात गोलंदाजी करावी लागली. त्यामुळे दवाचा घटक त्यांच्या मार्गात अडथळा ठरत आहे. कर्णधार टिम साऊदी, ट्रेंट बोल्ट सातत्याने खेळत असल्याने न्यूझीलंडच्या संघातही बदल अपेक्षित आहे. त्याशिवाय मिचेल सँटनर किंवा इश सोधीपैकी एकाला वगळून टॉड ?स्टलला संधी मिळू शकते. ईडन गार्डन्सची खेळपट्टी फलंदाजांना पोषक असून दवाचा या लढतीवर प्रभाव पडेल.

संघ

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल, ऋतुराज गायकवाड, इशान किशन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, वेंकटेश अय्यर, यजुर्वेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज.

न्यूझीलंड : टिम साऊदी (कर्णधार), मार्टिन गप्टिल, डॅरेल मिचेल, टॉड अ‍ॅस्टल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, जिमी नीशाम, टिम सेईफर्ट, अ‍ॅडम मिल्ने, ट्रेंट बोल्ट, लॉकी फग्र्युसन, मिचेल सँटनर, इश सोधी, रचिन रवींद्र.

वेळ : सायंकाळी ७ वा. ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोटर्स १, १ हिंदी

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: India new zealand cricket series india today success editing curious akp