दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडवर ८ गडी राखून मात; शमी, रोहितची चमक

वृत्तसंस्था, रायपूर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोहम्मद शमीच्या (१८ धावांत ३ बळी) प्रभावी माऱ्यानंतर कर्णधार रोहित शर्माने (५० चेंडूंत ५१ धावा) झळकावलेल्या अर्धशतकाच्या बळावर भारताने न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ८ गडी राखून विजय मिळवत मालिकेत२-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.

न्यूझीलंडने दिलेल्या १०९ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारताने सावध सुरुवात केली. यानंतर सलामीवीर रोहित आणि शुभमन गिल (५३ चेंडूंत नाबाद ४० धावा) यांनी आक्रमक खेळ केला. दोघांनीही मिळून पहिल्या गडय़ासाठी ७२ धावांची भागीदारी रचत विजयाचा पाया रचला. अर्धशतक झळकावल्यानंतर रोहितला शिपलेने बाद केले. यानंतर मैदानात आलेल्या विराट कोहलीने (११) काही फटके मारले. मात्र, सँटनरने त्याला माघारी धाडले. गिल आणि मैदानात आलेल्या इशान किशनने (नाबाद ८) नंतर संघाच्या उर्वरित धावा केल्या आणि २०.१ षटकांत संघाला २ बाद १११ धावसंख्येपर्यंत पोहोचवत विजय मिळवून दिला. रोहितने आपल्या खेळीत सात चौकार व दोन षटकार मारले. न्यूझीलंडकडून हेन्री शिपले (१/२९) आणि मिचेल सँटनरने (१/२८) यांना बळी मिळवता आले.

त्यापूर्वी, भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनीही कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत चमकदार कामगिरी केली. शमीने सामन्याच्या पहिल्याच षटकांत न्यूझीलंडचा आक्रमक सलामीवीर फिन अॅलनला माघारी धाडले. त्याला आपले खातेही उघडता आले नाही. यानंतर मोहम्मद सिराजने हेन्री निकोल्सला (२) बाद करत न्यूझीलंडला दुसरा धक्का दिला. यानंतर डॅरेल मिचेल (१), डेव्हॉन कॉन्वे (७) आणि कर्णधार टॉम लॅथम (१) यांचा भारताच्या भेदक गोलंदाजी माऱ्यासमोर निभाव लागला नाही व न्यूझीलंडची अवस्था ५ बाद १५ अशी बिकट झाली. यानंतर ग्लेन फिलिप्स (३६), गेल्या सामन्यातील शतकवीर मायकल ब्रेसवेल (२२) आणि सँटनर (२७) यांनी दिलेल्या योगदानामुळे न्यूझीलंडला ३४.३ षटकांत १०८ धावसंख्येपर्यंतच पोहोचता आले. भारताकडून शमीला हार्दिक पंडय़ा (२/१६), वॉशिंग्टन सुंदर (२/७), सिराज (१/१०) यांची साथ मिळाली.

संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड : ३४.३ षटकांत सर्वबाद १०८ (ग्लेन फिलिप्स ३६,मिचेल सँटनर २७, मायकल ब्रेसवेल २२; मोहम्मद शमीच्या ३/१८,हार्दिक पंडय़ा (२/१६) पराभूत वि. भारत : २०.१ षटकांत २ बाद १११ (रोहित शर्मा ५१, शुभमन गिल नाबाद ४०; हेन्री शिपले १/२९, मिचेल सँटनर १/२८)
सामनावीर : मोहम्मद शमी</p>

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India new zealand odi series india winning lead in the series amy
First published on: 22-01-2023 at 03:35 IST