scorecardresearch

India Open 2022: लक्ष्य सेनची पदार्पणातच मोठी कामगिरी; वर्ल्ड चॅम्पियनला मात देत पटकावलं विजेतेपद

इंडिया ओपन बॅडमिंटन सुपर 500 स्पर्धेतील लक्ष्यचे हे पहिले विजेतेपद आहे.

( Photo : @BAI_Media / Twitter )

लक्ष्य सेनने इंडियन ओपन पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. इंडियन ओपन बॅडमिंटन सुपर 500 या स्पर्धेत पदार्पणातच पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावणारा लक्ष्य सेन पहिला भारतीय ठरला आहे. त्याने रविवारी नवी दिल्ली येथे झालेल्या रोमांचक अंतिम सामन्यात विद्यमान विश्वविजेत्या लोह कीन य्यूचा २४-२२, २१-१७ असा पराभव केला. लक्ष्यने ५४ मिनिटे चाललेल्या या सामन्यात सिंगापूरच्या लोहला धूळ चारली आहे. लक्ष्य सेनने पराभूत केलेल्या लोहने किदाम्बी श्रीकांतचा डिसेंबरमध्ये पराभव करून जागतिक विजेतेपद पटकावले होते.

इंडिया ओपन बॅडमिंटन सुपर 500 स्पर्धेतील लक्ष्यचे हे पहिले विजेतेपद आहे. याआधी २०२१ च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सेमीफायनलमध्ये श्रीकांतकडून पराभूत झाल्यानंतर त्याने कांस्यपदक जिंकले होते. लक्ष्यने पहिल्या गेममध्ये १६-१० अशी आघाडी घेतली होती आणि लोहने १९-१९ अशी बरोबरी साधली होती. लक्ष्यने २४-२२ असा विजय मिळवण्यापूर्वी या जोडीने मॅच पॉइंट्सची देवाणघेवाण केली. दुसरा गेम बरोबरीत सुटला पण लक्ष्यने १९-१७ अशी आघाडी घेत सलग दोन गुण मिळवून सामना आणि विजेतेपद जिंकले.

दरम्यान, भारतीय खेळाडूंनी यंदा इंडिया ओपन बॅडमिंटन सुपर 500 स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. चिराग-सात्विक जोडीने पुरुष दुहेरी स्पर्धा जिंकली आहे. तर, लक्ष्य सेनने एकेरीचे विजेतपद पटकावले आहे.

लक्ष्य सेन याप्रकारे सुपर 500 मध्ये विजय मिळवणारा तिसरा भारतीय पुरुष ठरला आहे. याआधी १९८१ मध्ये प्रकाश पादुकोण आणि २०१५मध्ये किदाम्बी श्रीकांत यांनी सुपर 500 चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकली होती.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: India open 2022 lakshya sen beats world champion loh kean yew in final wins title on tournament debut hrc

ताज्या बातम्या