पीटीआय, दुबई
भारत महिला एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धचा निर्णायक सामना पाच ऑक्टोबरला कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियम या तटस्थ स्थानी खेळणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) सोमवारी विश्वचषक स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर केला. या वर्षाच्या सुरुवातीला चॅम्पियन्स करंडक आणि त्यानंतरच्या सामन्यांसाठी स्वीकारण्यात आलेल्या संमिश्र प्रारूपानुसार (हायब्रिड मॉडल) कोलंबो येथेही सामने होतील. भारताने ‘आयसीसी’ चॅम्पियन्स करंडकासाठी (पुरुष) पाकिस्तानला जाण्यास नकार दिला होता.
दहशतवादी हल्ल्यानंतर ‘आयसीसी’ भारत व पाकिस्तानदरम्यान साखळी सामन्याचे आयोजन करणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष होते. भारतीय संघ आपल्या मोहिमेची सुरुवात ३० सप्टेंबरला बंगळूरुमध्ये श्रीलंकेविरुद्ध करणार आहे. हा विश्वचषकाचा उद्घाटनीय सामना असेल. भारत २६ ऑक्टोबरला याच मैदानावर बांगलादेशचा सामना करेल. भारताचे अन्य सामने नऊ ऑक्टोबरला दक्षिण आफ्रिका आणि १२ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध विशाखापट्टणम येथे होतील. संघ १९ ऑक्टोबरला इंदूरमध्ये इंग्लंडचा सामना करेल. तर, २३ ऑक्टोबरला गुवाहाटी येथे त्यांच्यासमोर न्यूझीलंडचे आव्हान असणार आहे. पहिला उपांत्य सामना २९ ऑक्टोबरला गुवाहाटी किंवा कोलंबो येथे होईल. मात्र, पाकिस्तान स्पर्धेत कशी आगेकूच करतो यावर सर्व काही अवलंबून असेल. दुसरा उपांत्य सामना ३० ऑक्टोबरला बंगळूरु येथे पार पडेल. तर, अंतिम सामना दोन नोव्हेंबरला बंगळूरु किंवा कोलंबो येथे होणार आहे.
विश्वचषकातील भारताचे सामने
● भारत वि. श्रीलंका, ३० सप्टेंबर, बंगळूरु
● भारत वि. पाकिस्तान, ५ ऑक्टोबर, कोलंबो
● भारत वि. दक्षिण आफ्रिका, ९ ऑक्टोबर, विशाखापट्टणम
● भारत वि. ऑस्ट्रेलिया, १२ ऑक्टोबर, विशाखापट्टणम
● भारत वि. इंग्लंड, १९ ऑक्टोबर, इंदूर
● भारत वि. न्यूझीलंड, २३ ऑक्टोबर, गुवाहाटी
● भारत वि. बांगलादेश, २६ ऑक्टोबर, बंगळूरु