नुकत्याच झालेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत गतविजेत्या भारतीय संघाचा प्रवास उपांत्य फेरीतच संपुष्टात आला. मात्र तरीही भारतीय संघाने जागतिक क्रमवारीत दुसरे स्थान कायम राखले आहे. विश्वविजेतेपद पटकावणारा ऑस्ट्रेलियाचा संघ १२२ गुणांसह अव्वल स्थानी आहेत, तर भारतीय संघ ११६ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. यंदाच्या विश्वचषकातही उपांत्य फेरीची मर्यादा ओलांडू न शकलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ तिसऱ्या स्थानी आहे.
फलंदाजांच्या क्रमवारीत विराट कोहली चौथ्या, शिखर धवन सहाव्या तर कर्णधार महेंद्रसिंग धोनी आठव्या स्थानी आहेत. दक्षिण आफ्रिकेचा एबी डी’व्हिलियर्स अव्वल स्थानी कायम आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल दहामध्ये एकाही भारतीय गोलंदाजाला स्थान मिळू शकलेले नाही.