गेल्या दोन दशकांमधील सर्वोत्तम कामगिरी
भारतीय फुटबॉल संघाने ताज्या फिफा क्रमवारीत ९६व्या स्थानावर झेप घेतली आहे. गेल्या दोन दशकांमधील भारताची ही सर्वोत्तम कामगिरी असून, आतापर्यंतची दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम उंची गाठली आहे.
आशियाई देशांपैकी अग्रेसर इराणचा संघ फिफा क्रमवारीत २३व्या स्थानावर आहे. आशियाई देशांमध्ये भारत फिफा क्रमवारीत १२वा आहे. भारताने फेब्रुवारी १९९६ मध्ये उत्तुंग भरारी घेताना ९४वे स्थान प्राप्त केले होते. त्यानंतर नोव्हेंबर १९९३ मध्ये ९९वे स्थान मिळवले होते.
भारताच्या फुटबॉल संघाच्या कामगिरीचा आलेख उंचावत असून, गेल्या दोन वर्षांत संघाने ७७ स्थानांनी आगेकूच केली आहे. भारताने गेल्या १५ सामन्यांपैकी १३ सामने जिंकले आहेत. याशिवाय गेल्या आठ सामन्यांत (भूतानविरुद्ध मैत्रीपूर्ण सामन्यासह) भारत पराभूत झालेला नाही.
फेब्रुवारी २०१५मध्ये स्टीफन कॉन्स्टन्टाइन यांनी राष्ट्रीय प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळली, तेव्हा भारत १७१व्या स्थानावर होता. त्यानंतर मार्च २०१५ मध्ये भारताची १७३व्या घसरण झाली होती.
भारतीय संघाचे अभिनंदन करताना अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल म्हणाले, ‘‘भारतीय फुटबॉलसाठी ही आशादायी कामगिरी होत आहे. दोन वर्षांपूर्वी आम्ही १७३व्या स्थानावर होतो आणि आता फिफा क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. राष्ट्रीय संघातील खेळाडू, प्रशिक्षक आणि साहाय्यक यांच्यासह संघटनेतील सर्वाचे मन:पूर्वक अभिनंदन!’’
भारतीय संघटनेचे सचिव कुशल दास म्हणाले, ‘‘मकाऊविरुद्ध ५ सप्टेंबरला होणाऱ्या एएफसी आशियाई चषक पात्रता सामन्याआधी मिळालेल्या या शुभ वार्तेमुळे सर्वाचाच आत्मविश्वास वाढला आहे. हा महत्त्वाचा टप्पा गाठण्यासाठी जिवापाड मेहनत घेणाऱ्या संघाला माझा सलाम. आता २०१९ मध्ये होणाऱ्या आशियाई चषक स्पध्रेसाठी पात्र होणे, हे आमचे प्रमुख लक्ष्य आहे.’’
कॉन्स्टन्टाइन म्हणाले, ‘‘जेव्हा मी भारताच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळली, तेव्हा संघाला १००व्या स्थानापुढे नेण्याचे उद्दिष्ट निश्चित केले होते. परंतु सर्वाच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळेच हे साध्य झाले आहे.’’
जर्मनी अव्वल स्थानावर
चिलीला नमवून नुकतेच कॉन्फेडरेशन चषक विजेतेपद जिंकणाऱ्या विश्वविजेत्या जर्मनीने ब्राझीलचे फिफा क्रमवारीतील अव्वल स्थान हिसकावले आहे. अर्जेटिनाचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे, तर पोर्तुगाल आणि स्वित्र्झलड अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत.
क्रीडामंत्र्यांचा भारतीय फुटबॉल महासंघाला पाठिंबा
२० वर्षांखालील वयोगटाच्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पध्रेच्या यजमानपदासाठी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने उत्सुकता दर्शवली होती. केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी संघटनेच्या भूमिकेला आपला पाठिंबा दिला आहे.
ऑक्टोबर महिन्यात १७ वर्षांखालील विश्वचषकाचे नियोजन करीत असताना भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी २०१९च्या २० वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पध्रेच्या यजमानपदाचे संकेत दिले होते.