पहिल्या कसोटीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर भारतीय संघासमोर दुसऱ्या कसोटीसाठी मोठं आव्हान निर्माण आहे. विराट कोहलीचं भारतात परतणं, पृथ्वी शॉचं फॉर्मात नसणं आणि मोहम्मद शमीला झालेली दुखापत यामुळे अंतिम ११ जणांच्या संघात कोणाला स्थान द्यायचं यावरुन सध्या चर्चांना उधाण आलं आहे. विराटच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे उर्वरित कसोटी सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्व करेल. या सामन्यांआधी माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने अजिंक्य रहाणेला मोलाचा सल्ला दिला आहे.

अवश्य वाचा – दुसऱ्या कसोटीआधी वासिम जाफरचा अजिंक्य रहाणेला खास संदेश, पाहा…तुम्हाला कळतोय का याचा अर्थ

“माझ्या मते अजिंक्य रहाणेने आता चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी यायला हवं. जर गिल, राहुल किंवा विहारी यांना त्याच्याआधी संधी दिली तर यातून चुकीचा मेसेज दिला जाऊ शकतो. रहाणेने पाच गोलंदाजांनिशी खेळण्याचा आग्रह धरायला हवा. सध्या रविंद्र जाडेजा ज्या फॉर्मात आहे ते पाहता अजिंक्य सहज स्वतःला चौथ्या क्रमांकावर बढती देऊ शकतो. स्मिथ, लाबुशेन, वेड, हेड, पेन यासारखे फलंदाज असताना भारताने पाच गोलंदाजांनिशी मैदानावर उतरायला हवं.” गंभीर ESPNCricinfo ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

अवश्य वाचा – कामगिरी सुधारा, जबाबदारी घ्या ! पहिल्या कसोटीतील पराभवानंतर रहाणे-पुजाराला मॅनेजमेंटची ताकीद

यावेळी बोलत असताना गंभीरने प्रत्येकवेळी ४०० धावा करणं महत्वाचं नसतं असंही म्हटलं. “कधीकधी समोरच्या संघाला आपण झटपट कसे बाद करु शकतो याचा विचारही झाला पाहिजे. सध्या रविंद्र जाडेजाला पाचवा गोलंदाज म्हणून संघात स्थान दिल्यास आपण कांगारुंना कडवी टक्कर देऊ शकतो.” २६ डिसेंबरला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मेलबर्न येथे दुसरा कसोटी सामना सुरु होणार आहे.

अवश्य वाचा – फोन बंद करा, संघ म्हणून एकत्र या आणि पुढचा विचार करा ! मोहम्मद कैफचा भारतीय संघाला सल्ला