पीटीआय, राजकोट : दडपणाखाली असलेल्या कर्णधार ऋषभ पंतकडून शुक्रवारी होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात भारतीय संघाला मोठय़ा खेळीची अपेक्षा आहे. तसेच पाच सामन्यांच्या या मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी भारताला पुन्हा विजय अनिवार्य आहे.

पंतच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला पहिल्या दोन ट्वेन्टी-२० सामन्यांत पराभव पत्करावा लागला होता. मात्र, विशाखापट्टणम येथे झालेल्या तिसऱ्या सामन्यात भारताने खेळ उंचावत विजय संपादला आणि या मालिकेतील आव्हान शाबूत ठेवले. मात्र, ही मालिका जिंकायची असल्यास भारताला उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील. तसेच भारताला आपल्या तारांकित खेळाडूंकडून दमदार कामगिरीची आवश्यकता आहे.

गेल्या सामन्यात ऋतुराज गायकवाड आणि इशान किशन या सलामीवीरांनी अर्धशतके साकारत भारताला आक्रमक सुरुवात करून दिली. मात्र, मधल्या फळीतील फलंदाजांना फारसे योगदान देता आले नाही. विशेषत: कर्णधार पंतला या मालिकेत लौकिकाला साजेसा खेळ करता आलेला नाही. त्याने तीन सामन्यांत मिळून केवळ ४० धावा केल्या आहेत. गेल्या सामन्यात फलंदाजीला अनुकूल खेळपट्टीवर डावखुऱ्या पंतला आठ चेंडूंत केवळ सहा धावा करता आल्या. त्यामुळे त्याच्यावर धावांसाठी दडपण आहे. तसेच भारताचा कर्णधार म्हणून गेल्या सामन्यात पंतने पहिल्या विजयाची नोंद केली असली त्याने कामगिरीत सातत्य राखणे आणि गोलंदाजांचा योग्य वापर करणे गरजेचे आहे.

डीकॉकच्या पुनरागमनाची शक्यता

मनगटाच्या दुखापतीमुळे आफ्रिकेचा यष्टीरक्षक-फलंदाज क्विंटन डीकॉकला गेल्या दोन सामन्यांना मुकावे लागले. मात्र, तो दुखापतीतून सावरला असून या सामन्यात त्याच्या पुनरागमनाची दाट शक्यता आहे. तो कर्णधार टेम्बा बव्हुमाच्या साथीने सलामीला येऊ शकेल. मधल्या फळीत आफ्रिकेला रासी व्हॅन डर डसन, डेव्हिड मिलर आणि हेन्रिच क्लासन यांच्याकडून सातत्यपूर्ण कामगिरीची अपेक्षा आहे. आफ्रिकेचे फिरकीपटू तबरेज शम्सी आणि केशव महाराज यांनी १० हून अधिकच्या धावगतीने धावा दिल्या आहेत. त्यामुळे त्यांचा कामगिरी सुधारण्याचा मानस असेल. वेगवान गोलंदाजीची मदार कॅगिसो रबाडा, आनरिख नॉर्किए आणि वेन पार्नेल या अनुभवी त्रिकुटावर आहे.

आवेशला वगळणार?

पहिले दोन सामने गमावल्यानंतरही भारताने तिसऱ्या सामन्यासाठी संघात बदल करणे टाळले. मात्र, ‘आयपीएल’मध्ये दर्जेदार कामगिरी करणाऱ्या युवा वेगवान गोलंदाज आवेश खानला अजून आंतरराष्ट्रीय स्तरावर छाप पाडता आलेली नाही. या मालिकेच्या तीन सामन्यांत त्याला एकही बळी मिळवता आलेला नाही. त्यामुळे त्याला वगळून डावखुरा अर्शदीप सिंग आणि तेजतर्रार माऱ्यासाठी ओळखला जाणारा उमरान मलिक यांच्यापैकी एकाला पदार्पणाची संधी देण्याचा भारतीय संघ विचार करू शकेल. फिरकीची धुरा पुन्हा यजुर्वेद्र चहल आणि अक्षर पटेल सांभाळतील. फलंदाजीत श्रेयस अय्यर, हार्दिक पंडय़ा आणि दिनेश कार्तिक या अनुभवी खेळाडूंकडून भारताला अधिक योगदानाची आवश्यकता आहे.

संघ

भारत : ऋषभ पंत (कर्णधार/यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, श्रेयस अय्यर, हार्दिक पंडय़ा, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, यजुर्वेद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, दीपक हुडा, वेंकटेश अय्यर, रवी बिश्नोई.

दक्षिण आफ्रिका : टेम्बा बव्हुमा (कर्णधार), क्विंटन डीकॉक (यष्टीरक्षक), रीझा हेन्ड्रिक्स, रासी व्हॅन डर डसन, हेन्रिच क्लासन, डेव्हिड मिलर, ड्वेन प्रिटोरियस, केशव महाराज, तबरेज शम्सी, वेन पार्नेल, कॅगिसो रबाडा, आनरिख नॉर्किए, लुंगी एन्गिडी, मार्को यान्सेन, ट्रिस्टन स्टब्ज.

  • वेळ : सायं. ७ वा.
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी (एचडी वाहिन्यांसह)