नवी मुंबई : उपांत्य फेरीपूर्वी खेळातील उणिवा दूर करण्यासाठी भारतीय महिला संघाला आज, रविवारी अखेरची संधी मिळणार आहे. महिला एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अखेरच्या साखळी लढतीत भारताची तुलनेने दुबळ्या बांगलादेशशी गाठ पडणार असून यावेळी भरीव सांघिक कामगिरीचा यजमानांचा प्रयत्न असेल.
नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर तीन दिवसांपूर्वी झालेल्या सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करत भारतीय महिला संघाने उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. आता याच मैदानावर भारतीय संघ आपला अखेरचा साखळी सामना खेळणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध स्मृती मनधाना आणि प्रतिका रावल या सलामीच्या फलंदाजांनी शानदार शतके झळकावली. त्यांच्या विक्रमी कामगिरीनंतर मुंबईकर जेमिमा रॉड्रिग्जनेही आक्रमक अर्धशतक साकारत भारताला भक्कम स्थितीत पोहोचवले. त्यानंतर न्यूझीलंडला पुनरागमन करणे जमले नाही.
भारतीय संघाने याआधी सलग तीन सामन्यांत पराभव पत्करला होता. परंतु न्यूझीलंडविरुद्धच्या विजयाने भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास निश्चित उंचावला असेल. आता हीच लय बांगलादेशविरुद्ध कायम राखण्याचा भारताचा प्रयत्न असेल.
भारताला मनधाना वगळता अन्य फलंदाजांच्या कामगिरीची चिंता होती. मात्र, गेल्या दोन सामन्यांत मनधानासह कर्णधार हरमनप्रीत कौर, दीप्ती शर्मा, प्रतिका रावल आणि जेमिमा यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यामुळे भारताची ही चिंता दूर झाली आहे. परंतु गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात अजूनही सुधारणेला वाव आहे. आता याच आघाडीवर अधिक चांगल्या कामगिरीचा भारताचा प्रयत्न असेल.
वेळ : दुपारी ३ वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस १, २ हिंदी, जिओहॉटस्टार ॲप.
उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचे आव्हान
– भारतीय महिला संघाला विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न साकार करायचे झाल्यास आधी त्यांना उपांत्य फेरीत बलाढ्य ऑस्ट्रेलियाचे आव्हान पार करावे लागले.
– विश्वचषकात शनिवारी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा सात गडी आणि १९९ चेंडू राखून धुव्वा उडवत गुणतालिकेतील अग्रस्थान निश्चित केले. ऑस्ट्रेलियाने सातपैकी सहा साखळी सामने जिंकले, तर त्यांचा एक सामना पावसामुळे रद्द झाला.
– आता नियमानुसार, उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाची गाठ गुणतालिकेत चौथ्या स्थानी असणाऱ्या भारताशी पडले. हा सामना ३० ऑक्टोबरला (गुरुवार) नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवरच होईल.
– भारतीय संघाने रविवारी बांगलादेशविरुद्धचा साखळी सामना जिंकला, तरी ते गुणतालिकेत चौथ्या स्थानीच राहतील. दुसऱ्या उपांत्य सामन्यात इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका समोरासमोर येतील.
