भारताला घरच्या मैदानावर डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेतील जागतिक प्ले-ऑफ गटात नोवाक जोकोव्हिकच्या सर्बियाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. ही लढत १२ ते १४ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे.
बोगदान ओब्राडोव्हिकच्या नेतृत्वाखाली उतरणाऱ्या सर्बियाला जागतिक गटातील पहिल्या फेरीत स्वित्र्झलडविरुद्ध २-३ असा पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे त्यांना प्ले-ऑफ गटात खेळावे लागत आहे. भारताने आशिया/ओशेनिया गटात दक्षिण कोरियावर ३-१ अशी मात करीत प्ले-ऑफ गटात स्थान मिळविले. भारताला २०११मध्ये सर्बियाविरुद्ध जागतिक गटातील पहिल्या फेरीत १-४ अशी हार स्वीकारावी लागली होती. युरोपियन/आफ्रिकन गटात खेळण्याची नामुष्की टाळण्यासाठी सर्बियाला भारताविरुद्धच्या आगामी लढतीत विजय मिळविणे अनिवार्य आहे.
या स्पर्धेत पाच वेळा अजिंक्यपद मिळविणारा स्पेन तसेच चार वेळा उपविजेतेपद मिळविणारा अर्जेटिना यांना जागतिक गटातील आव्हान राखण्यासाठी आगामी लढतींमध्ये विजय अनिवार्य आहे. त्यांना अनुक्रमे ब्राझील व इस्रायल यांच्याशी खेळावे लागणार आहे. या तुलनेत ऑस्ट्रेलिया, कॅनडा व अमेरिका यांच्यासाठी सोपा पेपर असणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाला उझबेकिस्तानशी खेळावे लागेल, तर अमेरिकेपुढे स्लोव्हाकियाचे आव्हान असेल. कॅनडाला घरच्या मैदानावर कोलंबियाशी झुंजावे लागणार आहे. क्रोएशियाला नेदरलँड्शी लढत द्यावी लागेल तर युक्रेनला बेल्जियमबरोबर खेळावे लागेल. या सर्व लढती १२ ते १४ सप्टेंबरदरम्यान
होणार आहेत.