भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने केलेल्या आक्रमक शतकाच्या जोरावर भारताने तिसऱ्या टी-२० सामन्यात विजय मिळवला आहे. इंग्लंडने दिलेलं १९९ धावांचं आव्हान भारताने रोहित शर्माच्या शतकी खेळीच्या जोरावर सहज पूर्ण केलं. रोहितने ५६ चेेंडूत नाबाद १०० धावांची खेळी केली. या खेळीत रोहितने ११ चौकार आणि ५ उत्तुंग षटकार खेचले. इंग्लंडचे सर्व गोलंदाज आज रोहितसमोर निष्प्रभ ठरले. सलामीवीर शिखर धवन माघारी परतल्यानंतर रोहितने लोकेश राहुल, विराट कोहली आणि हार्दिक पांड्या सोबत छोटेखानी भागीदाऱ्या रचत संघाला विजय मिळवून दिला. विराट आणि हार्दिक पांड्यानेही अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. इंग्लंडकडून डेव्हिड विली, जेक बॉल आणि ख्रिस जॉर्डन यांनी १-१ बळी घेतला.
या विजयासह भारताने आपल्या इंग्लंड दौऱ्याची सुरुवात विजयाने केली आहे. यानंतर होणाऱ्या वन-डे व कसोटी सामन्यांच्या मालिकेतही भारतीय संघ अशीच कामगिरी करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. गुरुवारपासून भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील वन-डे मालिकेला सुरुवात होणार आहे.
तत्पुर्वी विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय चांगलाच उलटला. इंग्लंडच्या गोलंदाजांनी तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताच्या गोलंदाजांची धुलाई करत १९८ धावांचा डोंगर उभा केला. सलामीवीर जेसन रॉय आणि जोस बटलर यांनी पहिल्या चेंडूपासून भारतीय गोलंदाजीवर आक्रमण करायला सुरुवात केली. विशेषकरुन रॉयने मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत सर्वच भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल केला. जेसन रॉयने ३१ चेंडूंमध्ये ६७ धावांची खेळी केली. सलामीची जोडी माघारी परतल्यानंतर कर्णधार मॉर्गन लवकर माघारी परतला. मात्र यानंतर प्रत्येक इंग्लिश फलंदाजाने आपल्या वाटेला आलेली जबाबदारी चोखपणे बजावत संघाला १९८ धावांचा टप्पा गाठून दिला.
आज गोलंदाजीसोबत भारतीय क्षेत्ररक्षकांनीही चांगलीच निराशा केली. हार्दिक पांड्याला सामन्यात सर्वाधिक ४ बळी मिळाले, मात्र यासाठी त्याला ३८ धावा मोजाव्या लागल्या. याव्यतिरीक्त सिद्धार्थ कौलने २ तर दिपक चहर आणि उमेश यादवने प्रत्येकी १-१ बळी घेतला.
- ७ गडी राखून भारत विजयी, मालिकाही २-१ ने खिशात
- हार्दिक पांड्याचीही रोहितला उत्तम साथ
- रोहित शर्माचं झुंजार शतक, भारत विजयाच्या जवळ
- भारताला तिसरा धक्का
- अखेर भारताची जमलेली जोडी फुटली, ख्रिस जॉर्डनच्या गोलंदाजीवर विराट माघारी
- भारताची हळूहळू लक्ष्याकडे वाटचाल
- रोहित शर्मा – विराट कोहलीमध्ये तिसऱ्या विकेटसाठी ८९ धावांची भागीदारी
- टी-२० क्रिकेटमध्ये रोहितने ओलांडला २ हजार धावांचा टप्पा
- भारताने गाठला १०० धावांचा टप्पा
- रोहित शर्माचंअर्धशतक, भारताची सामन्यात झुंज सुरुच
- दुसऱ्या बाजूने रोहित शर्माची फटकेबाजी सुरुच
- जेक बॉलच्या गोलंदाजीवर लोकेश राहुल मोठा फटका खेळताना माघारी, भारताला दुसरा धक्का
- भारताने ओलांडला ५० धावांचा टप्पा
- रोहित शर्मा – लोकेश राहुल जोडीने भारताचा डाव सावरला
- डेव्हिड विलीच्या गोलंदाजीवर शिखर धवन माघारी, भारताला पहिला धक्का
- रोहित शर्मा-शिखर धवन जोडीकडून डावाची आक्रमक सुरुवात
- २० षटकांत इंग्लंडची १९८ धावांपर्यंत मजल, भारताला विजयासाठी १९९ धावांचं आव्हान
- अखेरच्या चेंडूवर धाव घेताना ख्रिस जॉर्डन धावचीत, इंग्लंडचा नववा गडी माघारी
- एका टी-२० सामन्यात ५ झेल पकडणारा धोनी पहिला यष्टीरक्षक
- धोनीने यष्टींमागे पकडला झेल, सामन्यात धोनीचा पाचवा झेल
- अखेरच्या षटकात फटकेबाजी करण्याच्या नादात प्लंकेट माघारी, इंग्लंडला आठवा धक्का
- उमेश यादवच्या गोलंदाजीवर डेव्हिड विली माघारी, इंग्लंडचा सातवा गडी माघारी
- हार्दिक पांड्याला सामन्यात ४ बळी
- त्याच षटकात जॉनी बेअरस्ट्रो धोनीकडे झेल देत माघारी, इंग्लंडला सहावा धक्का
- पांड्याच्या गोलंदाजीवर बेन स्टोक्स माघारी, इंग्लंडचा निम्मा संघ माघारी
- दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी ३७ धावांची छोटेखानी भागीदारी
- बेन स्टोक्स – जॉनी बेअरस्ट्रो जोडीने इंग्लंडचा डाव सावरला
- एकाच षटकात हार्दिक पांड्याला दोन बळी
- त्याच षटकात अॅलेक्स हेल्स माघारी, इंग्लंडचा चौथा गडी माघारी
- धोनीने घेतला मॉर्गनचा झेल
- मात्र त्याच षटकात मोठा फटका खेळण्याच्या नादात मॉर्गन झेलबाद
- हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर चहलने मॉर्गनचा झेल सोडला
- दिपक चहरच्या गोलंदाजीवर धोनीकडे झेल गेत जेसन रॉय माघारी
- जेसन रॉयला माघारी धाडण्यात भारताला यश, इंग्लंडला दुसरा धक्का
- दरम्यानच्या काळात जेसन रॉयचं आक्रमक अर्धशतक
- सिद्धार्थ कौलने उडवला त्रिफळा, इंग्लंडला पहिला धक्का
- मात्र इंग्लंडची जमलेली जोडी फोडण्यात भारताला यश, जोस बटलर माघारी
- इंग्लंडची वेगाने १०० धावसंख्येकडे वाटचाल
- इंग्लंडने ओलांडला ५० धावांचा टप्पा
- भारतीय गोलंदाजीवर हल्लोबोल करत मैदानात चौफेर फटकेबाजी
- अॅलेक्स हेल्स-जोस बटलर जोडीची आक्रमक सुरुवात
- भुवनेश्वर, कुलदीप यादवला विश्रांती, सिद्धार्थ कौलला संघात जागा
- दिपक चहर आजच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणार
- भारताने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय