भुवनेश्वर कुमारच्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने दुसऱ्या वन-डे सामन्यात वेस्ट इंडिजवर डकवर्थ लुईस नियमानुसार ५९ धावांनी मात केली. पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताने ७ गड्यांच्या मोबदल्यात २७९ धावांपर्यंत मजल मारली. मात्र विंडीजच्या फलंदाजीदरम्यान सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यामुळे, यजमान संघाला विजयासाठी ४६ षटकात २७० धावांचं लक्ष्य देण्यात आलं. विंडीजचा संघ २१० धावांपर्यंत मजल मारु शकला. एविन लुईसचा अपवाद वगळता एकही फलंदाज भारतीय गोलंदाजांचा सामना करु शकला नाही. निकोलस पूरनने लुईसला चांगली साथ दिली मात्र त्यांची झुंज अपूरची पडली.
विंडीजच्या फलंदाजांनी डावाची सुरुवात आश्वासक पद्धतीने केली होती. पहिल्या विकेटसाठी ४५ धावांची भागीदारी झाल्यानंतर भुवनेश्वरने ख्रिस गेलला माघारी धाडलं. यानंतर शाई होप, शेमरॉन हेटमायरही झटपट माघारी परतले. यानंतर निकोलस पूरन आणि लुईस यांनी चौथ्या विकेटसाठी ५६ धावांची अर्धशतकी भागीदारी करत विंडीजच्या डावाला आकार दिला. अखेरीस कुलदीपने एविन लुईसला माघारी धाडत विंडीजची जमलेली जोडी फोडली. त्याने ६५ धावा केल्या.
यानंतर भुवनेश्वर कुमारने विंडीजच्या अखेरच्या फळीला कापून काढलं. रोस्टन चेस, केमार रोच, कार्लोस ब्रेथवेट हे फलंदाज झटपट माघारी परतले. विंडीजच्या तळातल्या फलंदाजांनीही फारशी झुंज दिली नाही आणि भारतीय गोलंदाजांनी आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. भारताकडून सामन्यात भुवनेश्वर कुमारने ४, कुलदीप यादव- मोहम्मद शामीने प्रत्येकी २-२ तर खलिल अहमद, आणि रविंद्र जाडेजाने प्रत्येकी १-१ बळी घेतला.
त्याआधी, कर्णधार विराट कोहलीचं शतक आणि मुंबईकर श्रेयस अय्यरच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने दुसऱ्या वन-डे सामन्यात २७९ धावांपर्यंत मजल मारली. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. यानंतर विराट कोहलीने रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यरच्या साथीने महत्वाच्या भागीदाऱ्या रचत भारतीय संघाला आश्वासक धावसंख्या उभारुन दिली. मोक्याच्या षटकांमध्ये विंडीजच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजीवर अंकुश लावत, फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखलं.
सामन्याच्या पहिल्याच षटकात शेल्डन कोट्रेलने शिखर धवनला आपल्या जाळ्यात अडकवत भारताला पहिला धक्का दिला. यानंतर विराट कोहलीने रोहित शर्माच्या साथीने भारतीय जोडीचा डाव सावरला. यावेळी रोहित शर्मा आपल्या नेहमीच्या फॉर्मात दिसत नव्हता, मात्र विराट कोहलीने विंडीजच्या गोलंदाजांचा समाचार घेत अर्धशतक झळकावलं. खेळपट्टीवर जम बसवण्यात अपयशी ठरलेला रोहित शर्मा रोस्टन चेसच्या गोलंदाजीवर १८ धावांवर माघारी परतला.
चौथ्या क्रमांकावर संधी मिळालेला ऋषभ पंतही फारशी चमक दाखवू शकला नाही. २० धावांवर असताना ब्रेथवेटने पंतचा त्रिफळा उडवला. यानंतर विराटने श्रेयस अय्यरच्या साथीने पुन्हा एकदा भागीदारी रचली. या दोन्ही फलंदाजांनी चौथ्या विकेटसाठी १२५ धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे भारताने २०० धावांचा टप्पा ओलांडला. यादरम्यान विराटने आपलं वन-डे कारकिर्दीतलं ४२ वं शतक पूर्ण केलं, तर वन-डे संघात संधी मिळालेल्या श्रेयस अय्यरनेही शतक झळकावत आपली निवड सार्थ ठरवली.
विराट कोहली माघारी परतल्यानंतर, मोक्याच्या क्षणी भारतीय फलंदाजांनी विकेट फेकण्यास सुरुवात केली. विराट १२० धावा काढून ब्रेथवेटच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर श्रेयस अय्यर, केदार जाधव आणि भुवनेश्वर कुमार हे खेळाडूही ठराविक अंतराने माघारी परतले. त्यामुळे मोक्याच्या षटकांमध्ये भारतीय फलंदाज धावा जमवू शकले नाहीत. वेस्ट इंडिजकडून कार्लोस ब्रेथवेटने ३ तर शेल्डन कॉट्रेल-जेसन होल्डर आणि रोस्टन चेसने प्रत्येकी १-१ बळी घेतला. भारताचा एक फलंदाज धावबाद झाला.
ओश्ने थॉमस मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर पायचीत होऊन माघारी
भारताची विंडीजवर ५९ धावांनी मात
मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर रविंद्र जाडेजाने घेतला झेल
भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर केमार रोच त्रिफळाचीत
कार्लोस ब्रेथवेट रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर झेलबाद
भुवनेश्वर कुमारने स्वतःच्या गोलंदाजीवरच घेतला चेसचा झेल
निकोलस पूरन भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर माघारी
कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर विराट कोहलीने घेतला झेल
लुईसच्या ८० चेंडूत ८ चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने ६५ धावा
भारतीय गोलंदाजीचा नेटाने सामना करत लुईसचं अर्धशतक
कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर हेटमायर माघारी
डकवर्थ लुईस नियमानुसार वेस्ट इंडिजला ४६ षटकांत २७० धावांचं लक्ष्य
वेस्ट इंडिजचे १२.५ षटकात ५५ धावांत २ गडी माघारी
खलिल अहमदने उडवला होपचा त्रिफळा
भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर गेल पायचीत
वेस्ट इंडिजला विजयासाठी २८० धावांचं आव्हान
कार्लोस ब्रेथवेटच्या गोलंदाजीवर केमार रोचने घेतला झेल
अखेरच्या षटकात चोरटी धाव घेताना केदार धावबाद, मोक्याच्या षटकांमध्ये भारतीय फलंदाजीवर अंकुश लावण्यात विंडीजचे गोलंदाज यशस्वी
कर्णधार जेसन होल्डरने उडवला श्रेयसचा त्रिफळा, श्रेयसची ७१ धावांची खेळी
भारताची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल
४२.२ षटकात भारताची धावसंख्या २३३/४
कार्लोस ब्रेथवेटच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात विराट कोहली केमार रोचच्या हाती झेल देत माघारी
मधल्या फळीत संधी मिळालेल्या श्रेयसची कर्णधार विराट कोहलीला उत्तम साथ
वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा समाचार घेत विराट कोहलीचं झुंजार शतक
वन-डे क्रिकेटमधल्या ४२ व्या शतकाची नोंद
कार्लोस ब्रेथवेटच्या गोलंदाजीवर पंत त्रिफळाचीत होऊन माघारी
धावा जमवण्यासाठी धडपडत असलेला रोहित शर्मा रोस्टन चेसच्या गोलंदाजीवर झेलबाद
भारताची जोडी फुटली, निकोलस पूरनने घेतला झेल
शिखर धवन माघारी परतल्यानंतर विराटने रोहितच्या साथीने अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला आहे. विंडीजच्या गोलंदाजाचा समाचार घेत विराटचं अर्धशतक
दरम्यान विराटने आजच्या सामन्यात आणखी एक विक्रम आपल्या नावे केला आहे,
जाणून घ्या सविस्तर.... माजी पाकिस्तानी खेळाडूला विराटचा धोबीपछाड, मानाच्या यादीत पटकावलं पहिलं स्थान
अवघ्या दोन धावा काढून शेल्डन कोट्रेलच्या गोलंदाजीवर धवन पायचीत होऊन तंबूत परतला
दुसऱ्या सामन्यासाठीही भारतीय संघात कोणतेही बदल नाहीत