कर्णधार विराट कोहली आणि यष्टीरक्षक ऋषभ पंत यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने अखेरच्या टी-२० सामन्यात यजमान वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात केली. विजयासाठी वेस्ट इंडिजने दिलेलं १४७ धावांचं आव्हान भारतीय फलंदाजांनी सहज पूर्ण केलं. विंडीजच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना बाद करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली, मात्र त्यांचे प्रयत्न फोल ठरले.

सलामीवीर शिखर धवनही आजच्या सामन्यात फारशी चमकदार कामगिरी करु शकला नाही. अवघ्या ३ धावांवर ओश्ने थॉमसने त्याचा त्रिफळा उडवला. यानंतर रोहित शर्माच्या जागी संघात संधी मिळालेल्या लोकेश राहुलही २० धावांवर माघारी परतला. यानंतर विराट कोहली आणि ऋषभ पंत यांनी भारतीय डावाची सुत्र हातात घेतली. दोन्ही फलंदाजांनी विंडीजच्या गोलंदाजांचा समाचार घेत भारताला विजयपथावर आणलं. विराटने ४५ चेंडूत ५९ तर ऋषभ पंतने ४२ चेंडूत ६५ धावा केल्या.

त्याआधी, दिपक चहर आणि नवदीप सैनीने केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने अखेरच्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजला १४६ धावांवर रोखण्यात यश मिळवलं. पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात, भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेत विंडीजच्या डावावर पुन्हा एकदा अंकुश मिळवला. वेस्ट इंडिजकडून कायरन पोलार्डने एकाकी झुंज देत ५८ धावांची अर्धशतकी खेळी केली.

सलग तिसऱ्या सामन्यात विंडीजच्या डावाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर एविन लुईस आणि सुनिल नरिन झटपट माघारी परतले. दिपक चहरने दोन्ही फलंदाजांना माघारी धाडलं. यानंतर शिमरॉन हेटमायरही चहरच्या गोलंदाजीवर पायचीत होऊन माघारी परतला. यानंतर कायरन पोलार्ड आणि निकोलस पूरन यांनी चौथ्या विकेटसाठी वेस्ट इंडिजचा डाव सावरला. दोघांनीही चौथ्या विकेटसाठी ६६ धावांची भागीदारी केली.

नवदीप सैनीने पूरनला माघारी धाडत विंडीजची जमलेली जोडी फोडली. यानंतर कायरन पोलार्डनेही आपलं अर्धशतक पूर्ण केलं. पोलार्डने भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत ५८ धावा केल्या. पोलार्डने आपल्या खेळीत १ चौकार आणि ६ षटकार लगावले. पोलार्ड माघारी परतल्यानंतर रोव्हमन पॉवेल, कार्लोस ब्रेथवेट आणि फॅबिअल अ‍ॅलन यांनी झटपट धावा करत संघाला १४६ धावांचा टप्पा गाठून दिला. भारताकडून दिपक चहरने ३, नवदीप सैनीने २ तर राहुल चहरने १ बळी घेतला.

Live Blog

01:51 (IST)07 Aug 2019
भारताची मालिकेत बाजी, ७ गडी राखून विंडीजवर केली मात

विराट कोहली-ऋषभ पंतची अर्धशतकं ठरली निर्णायक

22:54 (IST)06 Aug 2019
वेस्ट इंडिजची ६ गडी गमावत १४६ धावांपर्यंत मजल

भारताला विजयासाठी १४७ धावांचं आव्हान

22:40 (IST)06 Aug 2019
कार्लोस ब्रेथवेट माघारी, विंडीजला सहावा धक्का

राहुल चहरने घेतला आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधला पहिला बळी

22:28 (IST)06 Aug 2019
कायरन पोलार्ड माघारी, विंडीजचा निम्मा संघ माघारी परतला

नवदीप सैनीने उडवला पोलार्डचा त्रिफळा

22:23 (IST)06 Aug 2019
कायरन पोलार्डचं अर्धशतक, विंडीजची झुंज सुरुच

वेस्ट इंडिजने ओलांडला शतकी धावसंख्येचा टप्पा

22:15 (IST)06 Aug 2019
अखेर विंडीजची जमलेली जोडी फोडण्यात भारताला यश

नवदीप सैनीच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक ऋषभ पंतकडे झेल देत निकोलस पूरन माघारी

22:10 (IST)06 Aug 2019
निकोलस पूरन-कायरन पोलार्ड जोडीने विंडीजचा डाव सावरला

विंडीजची सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल

21:35 (IST)06 Aug 2019
शिमरॉन हेटमायरही माघारी, विंडीजला तिसरा धक्का

दिपक चहरने घेतला सामन्यातला तिसरा बळी

21:33 (IST)06 Aug 2019
एविन लुईस माघारी, विंडीजचा दुसरा गडी बाद

दिपक चहरच्या गोलंदाजीवर लुईस पायचीत होऊन माघारी

टी-२० मालिकेतला लुईसचा खराब फॉर्म कायम

21:24 (IST)06 Aug 2019
विंडीजला पहिला धक्का, सुनिल नरिन माघारी

दिपक चहरने दुसऱ्या षटकात घेतला बळी, यजमान संघाची खराब सुरुवात

21:01 (IST)06 Aug 2019
असा असेल वेस्ट इंडिजचा अंतिम ११ जणांचा संघ...
21:00 (IST)06 Aug 2019
असा असेल भारताचा अंतिम ११ जणांचा संघ...
20:59 (IST)06 Aug 2019
भारतीय संघामध्ये ३ बदल, राहुल चहरचं पदार्पण

रोहित शर्माला विश्रांती - लोकेश राहुलला संघात स्थान

रविंद्र जाडेजाच्या जागेवर राहुल चहरला संघात स्थान

खलिल अहमदच्या जागी दिपक चहरला संधी

20:58 (IST)06 Aug 2019
अखेरच्या सामन्यातही भारताने नाणेफेक जिंकली

विराट कोहलीचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय