India U-19 Squad Announced by BCCI: आयपीएल २०२५ नंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. भारताचा सिनियर संघ, भारत अ संघ आणि भारताचा अंडर-१९ संघ अशा तिन्ही तुकड्या जूनमध्ये इंग्लंडविरूद्ध खेळताना दिसणार आहे. सर्वांच्या नजरा या तिन्ही तुकड्यांच्या संघांमध्ये कोणोकोणाची निवड होणार,यावर आहेत. बीसीसीआयने आधीच भारताचा अ संघ जाहीर केला होता. यानंतर आता अंडर-१९ संघाचीही घोषणा केली आहे.
भारताच्या ज्युनियर क्रिकेट समितीने २४ जून ते २३ जुलै २०२५ दरम्यान होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या १९ वर्षांखालील संघाची निवड केली आहे. या दौऱ्यात ५० षटकांचा सराव सामना, त्यानंतर पाच सामन्यांची युथ एकदिवसीय मालिका आणि इंग्लंड १९ वर्षांखालील संघाविरुद्ध दोन बहुदिवसीय सामने खेळवले जातील.
बीसीसीआयने या अंडर-१९ संघाचे नेतृत्त्व करण्याची जबाबदारी युवा फलंदाज आयुष म्हात्रेवर दिली आहे. यंदाच्या आयपीएल २०२५ मध्ये आयुष म्हात्रेने चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळताना आपल्या खेळीची छाप पाडली आहे. तर १४ वर्षीय फलंदाजी वैभव सूर्यवंशीची देखील संघात निवड करण्यात आली आहे. वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे याआधीही भारताच्या अंडर-१९ संघात एकत्र खेळताना दिसले आहेत. दोघेही इंग्लंड दौऱ्यावर सलामीला उतरणार आहेत.
रोहित शर्माला आपला आदर्श मानणारा आयुष हिटमॅनच्या पावलावर पाऊल ठेवत आता भारतीय संघाचे नेतृत्त्व करताना दिसणार आहे. आयुष म्हात्रे आयपीएल २०२४ मध्ये चेन्नईच्या ताफ्यात कर्णधार ऋतुराज गायकवाडचा बदली खेळाडू म्हणून सामील झाला. यानंतर त्याला मुंबई इंडियन्सविरूद्ध सामन्यात पदार्पणाची संधी मिळाली. पदार्पणाच्या सामन्यात त्याने आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीने सर्वांचं लक्ष वेधलं.
आयुषने आतापर्यंत ६ आयपीएल सामन्यांमध्ये सलामीवीर म्हणून खेळताना १८७च्या स्ट्राईक रेटने २०६ धावा केल्या आहेत. त्याची सर्वाेत्कृष्ट खेळी ९४ धावांची होती, अवघ्या ६ धावांनी त्याचं पहिलं आयपीएल शतक हुकलं. पण त्याने चेन्नई संघाला चांगली सुरूवात करून देत संघाचा डाव सावरला.
१४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने तर यंदाच्या आय़पीएलमध्ये वादळी खेळी करत सर्वांचं लक्ष वेधलं. संजू सॅमसनला दुखापत झाल्यानंतर वैभव सूर्यवंशीला पदार्पणाची संधी मिळाली आहे. वैभवने ३५ चेंडूत शतक झळकावत सर्वांनाच चकित केलं. तर त्याने पदार्पणातील पहिल्याच चेंडूवर षटकार खेचत आपल्या खेळीचा सर्वांना प्रत्यत दिला आहे. वैभवने ७ सामन्यांमध्ये २०६च्या स्ट्राईक रेटने २५२ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये १०१ धावा ही त्याची सर्वाेच्च धावसंख्या आहे.
इंग्लंड दौऱ्यासाठी भारताचा -१९ संघ:
आयुष म्हात्रे (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, विहान मल्होत्रा, मौल्यराजसिंह चावडा, राहुल कुमार, अभिज्ञान कुंडू (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), हरवंश सिंग (यष्टीरक्षक), आर एस अंबरीश, कनिष्क चौहान, खिलन पटेल, हेनिल मोहम्मद पटेल, युवराज पटेल, युवराज पटेल, युवराज, प्रदीपन आदित्य राणा, अनमोलजीत सिंग
स्टँन्डबाय खेळाडू
नमन पुष्पक,डी दिपेश, वेदांत त्रिपाठी, विकल्प तिवारी, अलंकृत रापोळे (यष्टीरक्षक)
भारताच्या अंडर-१९ संघांचं इंग्लंड दौऱ्याचं वेळापत्रक
२४ जून – भारत वि. इंग्लंड – ५० षटकांचा वॉर्म अप सामना
२७ जून – भारत वि. इंग्लंड – पहिला एकदिवसीय सामना
३० जून – भारत वि. इंग्लंड – दुसरा एकदिवसीय सामना
२ जुलै – भारत वि. इंग्लंड – तिसरा एकदिवसीय सामना
५ जुलै – भारत वि. इंग्लंड – चौथा एकदिवसीय सामना
७ जुलै – भारत वि. इंग्लंड – पाचवा एकदिवसीय सामना
१२ जुलै ते १५ जुलै – पहिला बहुदिवसीय सामना
२० जुलै ते २३ जुलै – दुसरा बहुदिवसीय सामना