रांची कसोटीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि मिचेल मार्शच्याऐवजी संघात संधी मिळालेल्या ग्लेन मॅक्सवेल यांनी मैदानात जम बसवून पहिल्या दिवसाअखेरीस संघाला ४ बाद २९९ धावा असा समाधानकारक आकडा गाठून दिला आहे. कसोटीचा नाणेफेक जिंकून प्रथम फंलदाजीचा निर्णय घेतलेल्या ऑस्ट्रेलियाला भारतीय गोलंदाजांनी पहिल्याच सत्रात तीन धक्के दिले होते. त्यामुळे भारतीय गोलंदाजांनी खूप चांगली सुरूवात करून दिली होती. उपहारापर्यंत ऑस्ट्रेलियाची अवस्था ३ बाद ९९ अशी होती. दुसऱया सत्रात पीटर हॅण्ड्सकोम्बला उमेश यादवने चालते केले. पण मैदानात स्टीव्ह स्मिथ तग धरून उभा होता. त्याला ग्लेन मॅक्सवेलने साजेशी साथ देऊन दोघांनी दुसरे आणि तिसरे सत्र खेळून काढले. दोघांनी पाचव्या विकेटसाठी १५९ धावांची भागीदारी रचली आहे.
दिवसाच्या अखेरीस स्मिथ ११७ ,तर मॅक्सवेल ८२ धावांवर नाबाद आहे. दरम्यान, सामन्यात क्षेत्ररक्षण करताना भारताचा कर्णधार विराट कोहली याच्या उजव्या खांद्याला दुखापत झाल्याने मैदानाबाहेर जावे लागले. कोहलीला सामन्याचे तिसरे सत्र खेळताच आले नाही. त्यामुळे भारतीय चाहत्यांची धाकधुक वाढली आहे. सामन्याच्या सुरूवातीला फिरकीपटू रविंद्र जडेजाने डेव्हिड वॉर्नरच्या रुपात भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर रेनशॉ(४४) उमेश यादवच्या गोलंदाजीवर स्लिपमध्ये कोहली करवी झेलबाद झाला. मग संघाची ८८ धावसंख्या असताना नुकताच मैदानात दाखल झालेल्या शॉन मार्शला(२) अश्विनने आपल्या फिरकी जाळ्यात ओढले. सामन्याच्या दुसऱया सत्रात पीटर हॅण्ड्सकोम्बला बाद करून उमेश यादवने आपली दुसरी विकेट घेतली. चार फलंदाज तंबूत दाखल झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव आजच्या दिवसात संपुष्टात येईल अशी परिस्थिती असताना स्मिथ-मॅक्सवेल जोडीने मैदानात जम बसवून कमबॅक केले आहे. कसोटी मालिकेत आघाडी घेण्याच्या दृष्टीने रांची कसोटी दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची आहे.