ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाचं दुखापतीचं सत्र अद्यापही सुरुच आहे. एकापाठोपाठ एक खेळाडू दुखापतग्रस्त होत आहे. यातच भर म्हणून ब्रिस्बेन येथे सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात नवदीप सैनीही दुखापतग्रस्त झाला. सैनीनंतर रोहित शर्माही दुखापतीपासून थोडक्यात बचावला आहे.

वॉशिंगटन सुंदर याच्या गोलंदाजीवर मार्नस लाबुशेन यानं बॅकवर्ड शॉटलेगवर चेंडू मारत चोरटी धाव घेतली. लाबुशेन चोरटी धाव घेण्यासाठी धावत असताना, त्यावेळी पृथ्वीनं चेंडू गोलंदाजाच्या दिशेनं भिरकावला, परंतु तो चेंडू सिली मिड ऑनवर उभा असलेल्या रोहित शर्माच्या हातावर जाऊन आदळला. आता रोहितच्या दुखापतीचा धक्का सहन करावा लागतो की काय, अशी चिंता वाटत होती. पण, रोहित तंदुरुस्त आहे. रोहित शर्माला कोणतीही दुखापत झाली नाही. काही क्षणासाठी मैदानावर शांतता परसली होती. रोहित शर्मानं तर कटाक्ष नजरेनं पृथ्वीकडे पाहिलं.

आणखी वाचा- नवदीप सैनीलाही दुखापत; भारतीय संघाच्या अडचणीत वाढ

पृथ्वी शॉच्या थ्रोमुळे रोहित शर्माला दुखपत होता होता वाचली. मात्र, त्यानंतर सोशल मीडियावर पृथ्वी शॉला ट्रोल करण्यात येत आहे. सलामीला जागा निर्माण करण्यासाठी पृथ्वी शॉला दुखापतग्रस्त करण्याचा पृथ्वीचा प्रयत्न असल्याचेही काही नेटकऱ्यांनी विनोदी भावनेत म्हटलं.

झटपट विकेट पडल्यानंतर लाबुशेन यानं शतकी खेळी करत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. अंजिक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांनी दिलेल्या जीवदानाचा फायदा घेत लाबुशेन यानं दमदार शतकी खेळी केली. ६५ षटकांनंतर ऑस्ट्रेलियानं चार गड्यांच्या मोबदल्यात २१० धावांचा पल्ला ओलांडला आहे.