एकेकाळी ‘लिंबू-टिंबू’ संघ म्हणून गणना होणाऱ्या बांगलादेशने विश्वचषक क्रिकेट स्पध्रेनंतर कात टाकली आहे, याचाच प्रत्यय बुधवारी आला. बांगलादेश भूमीवर पहिल्या दोन पराभवांसह मालिका गमावल्यानंतर तिसरा व अखेरचा एकदिवसीय सामना भारताने जिंकला, तेव्हा ‘हुश्श, जिंकलो एकदाचे’ हेच भाव समस्त भारतीय क्रिकेटरसिकांच्या चेहऱ्यावर होते. शिखर धवन व कर्णधार महेंद्रसिंग धोनीची दिमाखदार फलंदाजी तसेच सुरेश रैनाची अष्टपैलू कामगिरी या बळावर भारताने ७७ धावांनी विजय मिळवला.
शिखर धवनची ७५ धावांची संयमी खेळी आणि त्याला कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या जबाबदारीपूर्ण अर्धशतकाची साथ या बळावर भारताने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशविरुद्ध ६ बाद ३१७ धावा उभारल्या. त्यानंतर बांगलादेशच्या संघाची हे आव्हान पेलताना दमछाक झाली आणि त्यांचा डाव २४० धावांत आटोपला. रैनाने फलंदाजीत ३८ धावा केल्या, तर गोलंदाजीत ४५ धावांत ३ बळी घेतले आणि सामनावीर पुरस्कार पटकावला. तथापि, पहिल्यावहिल्या मालिकेत १३ बळी घेणाऱ्या मुस्ताफिझूर रहमानला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
बांगलादेशने नाणेफेक जिंकताच भारताला प्रथम फलंदाजी दिली. रोहित शर्माला मुस्ताफीझूर रहमानने तंबूची वाट दाखवली. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत पाच बळी मिळवण्याचे कर्तृत्व दाखवणाऱ्या रहमानने तिसऱ्यांदा रोहितला बाद करण्यात यश मिळवले. रहमानच्या खात्यावर तीन सामन्यांत आता १३ बळी जमा आहेत.
भारताच्या आव्हानात्मक धावसंख्येत दोन महत्त्वाच्या भागीदाऱ्या झाल्या. मग धवनने विराट कोहलीसोबत दुसऱ्या विकेटसाठी ७५ धावांची भागीदारी केली. मग धोनीने अंबाती रायुडू (४४) सोबत चौथ्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी केली. सुरेश रैनाने २१ चेंडूंत ३ चौकार आणि २ षटकारांसह ३८ धावा केल्या आणि भारताच्या धावफलकाचा वेग वाढवला.
बांगलादेशविरुद्धची एकदिवसीय मालिका गमावल्यामुळे धोनीच्या नेतृत्वावर टीका होत आहे. याचप्रमाणे धावांसाठी तो झगडत होता. मात्र बुधवारी धोनीने ७७ चेंडूंत ६९ धावा केल्या. यात ६ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. धवनने ७३ चेंडूंत १० चौकारांनिशी आपली खेळी साकारली. बांगलादेशकडून मश्रफी मुर्तझाने तीन बळी घेतले.
धावफलक
भारत : रोहित शर्मा झे. दास गो. मुस्ताफिझूर २९, शिखर धवन झे. नासिर हुसैन ७५, विराट कोहली त्रि. गो. हसन २५, महेंद्रसिंग धोनी झे. मुस्ताफिझूर गो. मुर्तझा ६९, अंबाती रायुडू झे. दास गो. मुर्तझा ४४, सुरेश रैना त्रि. गो. मुस्ताफिझूर ३८, स्टुअर्ट बिन्नी नाबाद १७, अक्षर पटेल नाबाद १०, अवांतर (बाइज ४, लेगबाइज ३, वाइड ३) १०, एकूण ५० षटकांत ६ बाद ३१७
बाद क्रम : १-३९, २-११४, ३-१५८, ४-२५१, ५-२६८, ६-३०१
गोलंदाजी : मुस्ताफीझूर रहमान १०-०-५७-२, मश्रफी मुर्तझा १०-०-७६-३, अराफत सन्नी ६-०-४२-०, रुबेल हुसैन ९-०-७५-०, नासिर हुसैन ६-०-२७-०, शाकिब अल हसन ९-१-३३-१
बांगलादेश : तमिम इक्बाल पायचीत गो. कुलकर्णी ५, सौम्या सरकार झे. अश्वीन गो. कुलकर्णी ४०, लिट्टन दास त्रि. गो. पटेल ३४, मुशफिकर रहिम झे. धोनी गो. रैना २४, शाकिब अल हसन झे. कुलकर्णी गो. रैना २०, सब्बीर रहमान त्रि. गो. बिन्नी ४३, नासिर हुसैन झे. रायुडू गो. अश्वीन ३२, मश्रफी मुर्तझा त्रि. गो. अश्वीन ०, अराफत सन्नी नाबाद १४, रुबेल हुसैन झे. पटेल गो. रैना २, मुस्ताफिझूर रहमान पायचीत गो. रायुडू ९, अवांतर (लेगबाइज ३, वाइड १३, नोबॉल १), एकूण ४७ षटकांत सर्व बाद २४०
बाद क्रम : १-८, २-६२, ३-११२, ४-११८, ५-१४८, ६-१९७, ७-२०५, ८-२१६, ९-२२२, १०-२४०
गोलंदाजी : स्टुअर्ट बिन्नी ६-०-४१-१, धवल कुलकर्णी ८-०-३४-२, उमेश यादव ४-०-३३-०, आर. अश्वीन १०-१-३५-२, अक्षर पटेल ९-१-४४-१, सुरेश रैना ८-०-४५-३, अंबाती रायुडू २-१-५-१.