India vs England 2nd Test: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना बर्मिंगहॅमच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडसमोर विजयासाठी ६०८ धावांचं आव्हान ठेवलं आहे. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडच्या फलंदाजांनी ७ विकेट्स गमावले आहेत. त्यामुळे भारतीय संघाला शेवटच्या दिवशी सामना जिंकण्यासाठी ७ विकेट्स काढायच्या आहेत. दरम्यान पाचव्या दिवशी कसं असेल बर्मिंगहॅममधील हवामान? जाणून घ्या.
भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी
या सामन्यात भारतीय गोलंदाज आणि फलंदाजांनी दमदार कामगिरी केली. फलंदाजांनी धावांचा डोंगर उभारला. तर भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या प्रमुख फलंदाजांना माघारी पाठवलं. सामन्यातील पहिल्या डावात भारतीय कर्णधार शुबमन गिलने सर्वाधिक २६९ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने पहिल्या डावात ५८७ धावांचा डोंगर उभारला. तर गोलंदाजांनी इंग्लंडचा डाव ४०७ धावांवर संपुष्टात आणला. या डावात भारतीय संघाने १८० धावांची मोठी आघाडी घेतली. पहिल्या डावात द्विशतकी खेळी केल्यानंतर दुसऱ्या डावातही गिलची बॅट चांगलीच तळपली. त्याने दुसऱ्या डावात १६१ धावा केल्या. यासह भारतीय संघाने दुसरा डाव ४२७ धावांवर घोषित करत इंग्लंडसमोर ६०८ धावांचं भलंमोठं आव्हान ठेवलं. या धावांचा बचाव करताना भारताने इंग्लंडच्या ३ फलंदाजांना माघारी धाडलं आहे. या सामन्यात भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर आहे.
पाचव्या दिवशी पाऊस हजेरी लावणार?
भारतीय संघ बर्मिंघमहॅममध्ये आपला पहिला विजय मिळवण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे. तर दुसरीकडे पाऊस भारतीय संघाच्या विजयात अडथळा निर्माण करू शकतो. अॅक्यूवेदरने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, पाचव्या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता ही ७९ टक्के इतकी असणार आहे. त्यामुळे पाऊस येणार हे नक्की. दुपारी १ वाजेपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता २२ टक्के इतकी असेल. हा सामना स्थानिक वेळेनुसार सकाळी १०:३० वाजता सुरू होणार आहे. त्यामुळे पहिलं सत्र पावसामुळे धुतलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, भारतीय संघाकडे सामना नावावर करण्याची संधी असणार आहे.
भारतीय गोलंदाजांना फायदा होणार?
पावसामुळे सामना थांबला तरीसुद्धा हवामान भारतीय संघाच्या बाजूने असेल. ढगाळ वातावरण भारतीय गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरेल. सामन्यादरम्यान जोरदार हवा सुटेल, याचा भारतीय वेगवान गोलंदाजांना फायदा होऊ शकतो. वेगवान गोलंदाजांना चांगला स्विंग मिळेल. त्यामुळे इंग्लंडच्या फलंदाजांचा ताण वाढणार यात काहीच शंका नाही. आता भारतीय गोलंदाज या अनुकूल परिस्थितीचा कसा फायदा करून घेतात, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.