भारत आणि न्यूझीलंडदरम्यानच्या तीन सामन्यांची टी-२० मालिका भारताने जिंकली. या मालिकेमधील कोलकाता येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताने पाहुण्या संघाला ७३ धावांनी पराभूत केलं. या मालिकेमधील शेवटच्या सामन्यात पहिल्यांदाच भारताकडून संधी मिळालेल्या ईशान किशनने आपल्या फलंदाजीसोबतच आपल्या क्षेत्ररक्षणानेही चाहत्यांची मनं जिंकली. ईशान किशनने केलेला एक भन्नाट थ्रो तर एवढा उत्तम होता की त्यामुळे फलंदाजाला थेट तंबूचा रस्ता पकडला.

१४ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर ईशान किशनने केलेल्या जबरदस्त थ्रोमुळे न्यूझीलंडचा फलंदाज टिम सेफर्ट धावबाद झाला. ईशान किशन खरं तर विकेटकीपर आहे. मात्र त्याने ज्या पद्धतीने डायरेक्ट थ्रो करुन फलंदाजाला बाद केलं ते पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. टिम सेफर्ट एक धाव काढून दुसरी चोरटी धाव घेण्यासाठी फार वेगात पळाला पण तो ईशानने फेकलेला चेंडू यष्ट्यांचा वेध घेईपर्यंत क्रीजमध्ये पोहचू शकला नाही. ईशानने उजव्या हाताने फेकलेला चेंडू एका टप्प्यात थेट स्टम्पवर लागला. ईशानने केलेला हा थ्रो एवढा अचूक होता की विकेटकीप ऋषभ पंत चेंडू पकडून धावबाद करण्यासाठी स्टॅम्पच्या मागे उभा असताना चेंडू स्टॅम्पला लागला आणि स्टॅम्प थेट पंतच्या हातात गेला.

ईशानचा हा भन्नाट थ्रो पाहून भारतीय कर्णधार रोहित शर्माही फारच प्रभावित झाला. त्याने ईशानला मिठी मारली. सामन्याबद्दल बोलायचं झालं तर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा रोहित शर्माचा निर्णय योग्य ठरला. रोहित आणि ईशान किशनने पहिल्या विकेटसाठी ६९ धावांची सलामी दिली.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत २० षटकांत ७ बाद १८४ अशी धावसंख्या उभारली. के. एल. राहुलच्या जागी सलामीला आलेल्या इशान किशन (२९) आणि रोहित यांनी आक्रमक शैलीत फलंदाजी करत ६.२ षटकांत ६९ धावांची सलामी दिली. रोहितने ५६ धावांची खेळी करताना सलग दुसरे अर्धशतक नोंदवले. त्यानंतर मधल्या फळीतील श्रेयस अय्यर (२५), वेंकटेश (२०) आणि चहर (नाबाद २१) यांच्या योगदानामुळे भारताने १८० धावांचा टप्पा ओलांडला.  यजमान भारताने दिलेल्या १८५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव १७.२ षटकांत १११ धावांतच आटोपला. त्यामुळे रोहित आणि राहुल द्रविड या नव्या कर्णधार-प्रशिक्षक पर्वाचीही मालिका विजयाने सुरुवात झाली. न्यूझीलंडचा अनुभवी सलामीवीर मार्टिन गप्टिलने एकाकी झुंज देताना ३६ चेंडूंत ५१ धावांची खेळी केली. भारताकडून डावखुरा फिरकीपटू अक्षरने अवघ्या नऊ धावांत तीन गडी बाद केले. त्याला हर्षल पटेलने दोन, तर दीपक चहर, यजुर्वेंद्र चहल आणि वेंकटेश अय्यर यांनी प्रत्येकी एक बळी घेत उत्तम साथ दिली.