India vs Pakistan: भारत आणि पाकिस्तानचा क्रिकेट संघ आशिया चषक २०२५ मध्ये तिसऱ्यांदा आमनेसामने येणार असून यंदा ४१ वर्षांनंतर हे दोन्ही संघ अंतिम सामन्यात एकमेकांविरोधात खेळणार आहेत. आधीच्या दोन सामन्यात ज्याप्रकारे भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये खटके उडाले, ते पाहता अंतिम सामन्याची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना लागली आहे. गुरूवारी (२५ सप्टेंबर) बांगलादेशला सुपर ४ फेरीतील सामन्यात ११ धावांनी नमवून पाकिस्तान संघाने अंतिम फेरी गाठली.
बांगलादेशला नमवून अंतिम फेरी गाठल्यानंतर पाकिस्तानच्या संघाचा उत्साह टिपेला पोहोचला आहे. सामन्यात विजय मिळवल्यानंतर पाकिस्तानी संघाचा कर्णधार सलमान आगा म्हणाला, “आम्ही ज्या पद्धतीने सामना जिंकलो, त्यावरून आमचा संघ खास असल्याचे सिद्ध झाले आहे. आमचे सगळे खेळाडू उत्तम खेळले. फलंदाजीत काही सुधारणांची आवश्यकता आहे. आम्ही त्यावर काम करू. मी आता अंतिम सामन्यासाठी खूप उत्साही आहे. पुढे काय करायचं ते आम्हाला माहिती आहे. आम्ही कुठल्याही संघाला पराभूत करू शकतो, आमचा संघ मजबूत आहे. रविवारी आम्ही भारताला पराभूत करण्याचा पूर्ण प्रयत्न करू.”
बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. बांगलादेशच्या गोलंदाजांनी सुरुवातीच्या षटकात चांगली गोलंदाजी करत पाकिस्तानला जेरीस आणले. १३ व्या षटकात केवळ ७१ धावांवर पाकिस्तानने ६ विकेट्स गमावल्या होत्या. मात्र त्यानंतर बांगलादेशच्या ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे पाकिस्तानच्या तळातील फलंदाजांनी चागंली धुलाई केली. शेवटच्या ६.३ षटकात पाकिस्तानने ६५ धावा चोपल्या. ज्यामुळे बांगलादेशसमोर १३५ धावांचे लक्ष्य उभे राहिले.
मात्र बांगलादेशच्या फलंदाजांना ही धावसंख्या गाठताना अपयश आले. २० षटकात बांगलादेशने ९ गडी गमावून १२४ धावा केल्या. पाकिस्तानच्या शाहीन शाह आफ्रिदीने चार षटकात १७ धावा देऊन तीन विकेट घेतल्या. तर हरिस रौफने ३३ धावा देऊन तीन विकेट घेतल्या. पाकिस्तानच्या फिरकीपटूंनीही बांगलादेशच्या फलंदाजांना फार संधी दिल्या नाहीत. बांगलादेशकडून शमीम हुसैन यांनी सर्वाधिक २५ चेंडूत ३० धावांची खेळी केली.
भारत-पाकिस्तान किती वेळा आमनेसामने?
भारत आणि पाकिस्तानचे संघ आतापर्यंत पाच वेळा अंतिम सामन्यात आमनेसामने आले आहेत. पाच किंवा त्यापेक्षा अधिक संघ असलेल्या स्पर्धेतील ही आकडेवारी आहे. पाच सामन्यांपैकी भारतीय संघाने केवळ दोन सामने जिंकले आहेत. तर पाकिस्तानच्या संघाचा तीनवेळा विजय झालेला आहे.
वर्ष | स्पर्धा | ठिकाण | निकाल |
१९८५ | बेन्सन अँड हेजेस वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ क्रिकेट | मेलबर्न | भारताने पाकिस्तानचा ८ विकेट्सनी पराभव केला. |
१९८६ | ऑस्ट्रल-आशिया कप | शारजाह | पाकिस्तानने भारताचा १ विकेटने पराभव केला |
१९९४ | ऑस्ट्र्ल-आशिया कप | शारजाह | पाकिस्तानने भारतावर ३९ धावांनी विजय मिळवला. |
२००७ | टी२० विश्वचषक | जोहान्सबर्ग | भारताने पाकिस्तानला ५ धावांनी हरवले |
२०१७ | चॅम्पियन्स ट्रॉफी | द ओव्हल | पाकिस्तानने भारतावर १८० धावांनी विजय मिळवला. |
२०१७ साली भारताला निराशाजनक पराभवाला सामोरे जावे लागले होते. फखर झमानच्या शतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने भारतासमोर ३३८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र या लक्ष्याचा पाठलाग करत असताना भारताचा संघ ३० षटकांत १५८ धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून हार्दिक पांड्याने ४३ चेंडूत ७६ धावांची खेळी केली. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताला मोठी हार पत्करावी लागली होती.