Pakistan vs Bangladesh Match: आशिया चषक २०२५ स्पर्धेत भारत-पाकिस्तान तिसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. यासाठी कारण ठरलं बांगलादेशची हाराकिरी. गुरूवारी दुबई येथे पार पडलेल्या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशच्या तोंडचा घास पळवला. बांगलादेश सहज विजयी होईल, असं वाटत असतानाच पाकिस्ताननं बांगलादेशवर सहज विजय मिळवला. हा विजय पाकिस्तानच्या खेळीमुळे कमी पण बांगलादेशच्या चुकांसाठी अधिक लक्षात राहिल. सामन्यानंतर बांगलादेशचा कर्णधार जाकेर अली याने शेवटी पराभवाच्या कारणांची माहिती दिली.
बांगलादेशनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. बांगलादेशच्या गोलंदाजांनी सुरुवातीच्या षटकात चांगली गोलंदाजी करत पाकिस्तानला जेरीस आणले. १३ व्या षटकात केवळ ७१ धावांवर पाकिस्तानने ६ विकेट्स गमावल्या. मात्र त्यानंतर बांगलादेशच्या ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे पाकिस्तानच्या तळातील फलंदाजांनी चागंली धुलाई केली. शेवटच्या ६.३ षटकात पाकिस्तानने ६४ धावा चोपल्या. ज्यामुळे बांगलादेशसमोर १३५ धावांचे लक्ष्य उभे राहिले.
टी-२० क्रिकेटमध्ये १३५ धावांचे लक्ष्य तसे किरकोळ होते. पण बांगलादेशच्या फलंदाजांनी हातघाईवर येऊन चुकीचे फटके खेळले ज्यामुळे एकामागून एक त्यांना विकेट्स गमवाव्या लागल्या. अखेर २० षटकात बांगलादेशला केवळ १२४ धावा करता आल्या आणि त्यांचे अंतिम फेरी गाठण्याचे स्वप्न धुळीस मिळाले.
सामन्यानंतर जाकेर अली संतापला
पाकिस्तानकडून निराशाजनक पराभव सहन करावा लागल्यानंतर कर्णधार जाकेर अलीने याचे खापर फलंदाजांवर फोडले. मागच्या दोन सामन्यात आमच्या फलंदाजांनी अपेक्षित कामगिरी न केल्यामुळे आम्हाला पराभव सहन करावा लागला, अशी खंत त्याने व्यक्त केली. आमचे गोलंदाज चांगली कामगिरी करत आहेत. पण फलंदाज चालत नसल्यामुळे आम्ही भारताविरोधातही मागचा सामना हरलो. आजच्या सामन्यातही फलंदाजांमुळे आमच्या पदरात निराशा पडली.
बांगलादेशची निराशाजनक फलंदाजी
१३६ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या बांगलादेशला पहिल्याच षटकात धक्का बसला. शाहीनशाह आफ्रिदीच्या गोलंदाजीवर सलामीवीर फलंदाज परवेज हुसेन शून्यावर बाद झाला. तर गेल्या सामन्यात अर्धशतक झळकावणारा सैफ हुसेन अवघ्या १८ धावा करत माघारी परतला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला तोहिद हृदोय अवघ्या ५ धावांवर माघारी परतला. मेहदी हसनने ११, नुरूल हसनने १६, जाकेर अलीने ५ धावांची खेळी केली. बांगलादेशचा संघ विजयापासून ११ धावा दूर राहिला.