‘अव्वल चार’ फेरीमध्ये पाकिस्तानची पाच गडी राखून सरशी; कोहलीचे अर्धशतक वाया

दुबई : भारतीय संघाला रविवारी आशिया चषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेतील ‘अव्वल चार’ फेरीच्या सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला. मोहम्मद रिझवान (५१ चेंडूंत ७१ धावा) आणि मोहम्मद नवाज (२० चेंडूंत ४२) यांच्या फटकेबाज खेळींमुळे  पाकिस्तानने पाच गडी आणि एक चेंडू राखून सरशी साधली.  

दुबई येथे झालेल्या या सामन्यात विराट कोहलीच्या अर्धशतकामुळे भारताने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १८१ अशी धावसंख्या उभारली. पाकिस्तानने हे आव्हान १९.५ षटकांत पूर्ण केले. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला (१४) लेग-स्पिनर रवी बिश्नोईने बाद केले. तसेच फखर झमानलाही (१५) फारसे योगदान देता आले नाही. यानंतर रिझवान आणि डावखुऱ्या नवाजने फटकेबाजी केली. त्यांनी सात षटकांतच ७३ धावांची भर घातली. भुवनेश्वर कुमारने नवाज, तर हार्दिक पंडय़ाने रिझवानला बाद करत सामन्यात रंगत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, खुशदिल शाह (११ चेंडूंत नाबाद १४) आणि आसिफ अली (८ चेंडूंत १६) यांनी भुवनेश्वरने टाकलेल्या १९व्या षटकात १९ धावा काढत पाकिस्तानला विजयासमीप नेले. मग अर्शदीप सिंगच्या अखेरच्या षटकात उर्वरित सात धावा करत पाकिस्तानला विजय मिळवून दिला. 

त्यापूर्वी, पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिल्यावर भारताने आक्रमक सुरुवात केली. सलामीवीर केएल राहुल (२० चेंडूंत २८ धावा) आणि कर्णधार रोहित शर्मा (१६ चेंडूंत २८ धावा) यांनी पाच षटकांत ५४ धावांची सालामी दिली. हे दोघेही बाद झाल्यानंतर गेल्या सामन्यातील अर्धशतकवीर सुर्यकुमार यादवकडून संघाला मोठी अपेक्षा होती, पण तो केवळ १३ धावा करून माघारी परतला. मग कोहलीने संघाचा डाव सावरला. त्याने ४४ चेंडूंत चार चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ६० धावांची खेळी साकारत सुस्थितीत पोहोचवले. अखेरीस दीपक हुडा (१६ धावा) आणि बिश्नोई (नाबाद ८) यांनीही काही चांगले फटके मारत भारताला २० षटकांत ७ बाद १८१ धावसंख्येपर्यंत पोहोचवले.

संक्षिप्त धावफलक

भारत : २० षटकांत ७ बाद १८१ (विराट कोहली ६०, केएल राहुल २८, रोहित शर्मा २८; शादाब खान २/३१) पराभूत वि. पाकिस्तान : (मोहम्मद रिझवान ७१, मोहम्मद नवाज ४२;

रवी बिश्नोई १/२६)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

३२ विराट कोहलीने या सामन्यात ट्वेन्टी-२० कारकीर्दीतील ३२ वे अर्धशतक झळकावले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याने अग्रस्थान मिळवले.