टेनिस हा वैयक्तिक स्वरूपाचा खेळ. डेव्हिस चषकाच्या निमित्ताने टेनिसपटू आणि त्यांचे देश एकरूप होतात. देशाला जिंकून देण्यासाठी कडवा मुकाबला रंगतो आणि त्यामुळेच डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेला टेनिस क्षेत्रात विशेष महत्त्व आहे. सर्बियाचे विविध टेनिसपटू जागतिक स्तरावर सातत्यपूर्ण कामगिरी करत आहेत. डेव्हिस चषकाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या या सर्बियन खेळाडूंचा भारताला सामना करायचा आहे. बंगळुरूत घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा भारतीय संघाला मिळणार आहे, मात्र नोव्हाक जोकोव्हिचच्या अनुपस्थितीतही दमदार कामगिरी करणाऱ्या सर्बियाच्या संघाला नमवणे भारतासमोरचे खडतर आव्हान आहे.
चार वर्षांपूर्वी २०१०मध्ये भारतीय संघ डेव्हिस चषकाच्या एलिट गटासाठी पात्र ठरला होता, मात्र पहिल्याच फेरीत सर्बियाने भारताचा ४-१ असा धुव्वा उडवला. या पराभवाची परतफेड करण्याची संधी भारताला आहे.
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या नोव्हाक जोकोव्हिचने थकव्याच्या कारणामुळे या लढतीतून माघार घेतली आहे. जॅन्को टिप्सारेव्हिच आणि व्हिक्टर ट्रॉयोकी हेही खेळू शकणार नाहीत. दुसान लाजोव्हिकच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळणार आहे. फिलीप क्रॅजेनोव्हिक हा एकेरीतील दुसरा खेळाडू हा सर्बियाचा कच्चा दुवा आहे. नेनाद झिम्नोझिक आणि इलिजा बोझोलझ्ॉक या जोडीवर सर्बियाच्या दुहेरीची मदार आहे.
भारताचा अव्वल खेळाडू सोमदेव देववर्मन सध्या खराब फॉर्मशी झुंजताना दिसत आहे. डेव्हिस चषकात सोमदेवने नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे सोमदेवकडून भारताला मोठय़ा अपेक्षा आहेत. युकी भांब्रीने चेन्नई चॅलेंजर स्पर्धेचे जेतेपद पटकावत चांगली सुरुवात केली, मात्र पायाला झालेल्या दुखापतीमुळे युकीला कोर्टपासून दूर राहावे लागले आहे. या दुखापतीतून तो आता सावरला असून, दिमाखदार पुनरागमन करण्यासाठी तो सज्ज आहे. अनुभवी लिएण्डर पेस उपलब्ध असल्याने दुहेरी भारताचे बलस्थान झाले आहे. डेव्हिस चषकात गेली अनेक वर्षे पेसने भारतासाठी गौरवशाली प्रदर्शन केले आहे. चाळिशीत असूनही तंदुरुस्त असलेला पेस सर्बियासाठी डोकेदुखी ठरू शकते. आंतरराष्ट्रीय स्तरावर ऐसाम उल हक कुरेशीच्या साथीने खेळणारा रोहन बोपण्णा पेसची साथ देणार आहे. युवा आणि अनुभवाचा मिलाफ असलेली ही जोडी भारताचे विजयाचे आशास्थान आहे.
अशा होणार लढती
*शुक्रवार, १२ सप्टेंबर
१. युकी भांब्री वि. दुसान लाजोव्हिक
२. सोमदेव देववर्मन वि. फिलीप क्रॅजेनोव्हिक
*शनिवार, १३ सप्टेंबर
३. लिएण्डर पेस आणि रोहन बोपण्णा वि. नेनाद झिम्नोझिक आणि इलिजा बोझोलझ्ॉक (दुहेरी)
*रविवार, १४ सप्टेंबर
४. सोमदेव देववर्मन वि. दुसान लाजोव्हिक
५. युकी भांब्री वि. फिलीप क्रॅजेनोव्हिक