नवी दिल्ली : देशाच्या ईशान्य भागात हिवाळ्यात लवकर सूर्यास्त होत असल्याने भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान गुवाहाटीच्या बरसापारामध्ये २२ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या सत्रांमध्ये फेरबदल करण्याचा विचार आहे. पहिल्या सत्रानंतर चहापानाचे सत्र आणि दुसऱ्या सत्रादरम्यान उपाहार घेतला जाऊ शकतो.
भारतात कसोटी सामने सकाळी ९.३० वाजता सुरू होऊन सायंकाळी ४.३० वाजता संपतात मात्र, गुवाहाटीच्या सामन्यातील दिवसाचा खेळ सकाळी नऊ वाजता सुरू होऊन सायंकाळी ४ वाजता संपेल. ‘‘पहिली विश्रांती सकाळी ११ ते ११.२० दरम्यान चहापानाची असेल. तर, दुपारी १.२० ते २ वाजेपर्यंत उपाहाराची विश्रांती असणार आहे. यानंतरचे सत्र २ ते ४ दरम्यान असेल.
गुवाहाटीमध्ये सूर्यास्त ४.१५ वाजता होतो. त्यामुळे सत्रांमध्ये अदलाबदल केली जाऊ शकते,’’ असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) एका सूत्राने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले. ‘‘आम्हाला अजूनपर्यंत ‘बीसीसीआय’कडून अधिकृत सूचना मिळालेली नाही. आसामचे स्थानिक रणजी करंडक सामने सकाळी ८.४५ वाजता सुरू होऊन ३.४५ ला संपतील, हे आम्ही सांगू शकतो. यामध्ये ११.१५ ला उपाहाराची विश्रांती असेल,’’ असे आसाम क्रिकेट संघटनेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
