टीम इंडियाने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत आफ्रिकन संघाला पूर्णपणे नेस्तनाबूत करत ‘व्हाइटवॉश’ दिला. तिसऱ्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ४९७ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेचा पहिला डाव १६२ धावांवर तर फॉलो-ऑन नंतरचा डाव १३३ धावांवर आटोपला. त्यामुळे एक डाव आणि २०२ धावांनी विजय मिळवत भारताने मालिका ३-० ने जिंकली.

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी पत्रकाराने विराटला प्रश्न विचारला की कसोटी सामना रांचीच्या मैदानावर सुरू आहे. हे धोनीचे घरचे मैदान आहे. तरीदेखील धोनी सामना बघायला का आलेला नाही? यावर विराटने अगदी मजेशीर उत्तर दिले. “धोनी सामना बघायला आलेला नाही हे तुम्हाला कोणी सांगितलं? धोनी आतासुद्धा इथेच आहे. तो ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंशी गप्पा-गोष्टी करत आहे. जा.. तुम्हीही त्याला भेटून ‘हॅलो’ म्हणून या”, असे मजेशीर उत्तर त्याने दिले.

दरम्यान, भारताच्या ४९७ धावांना प्रत्युत्तर देताना आफ्रिकेचा पहिला डाव १६२ धावांत आटोपला. दुखापतग्रस्त एडन मार्क्रमच्या जागी खेळणारा झुबायर हामझा याने टेम्बा बावुमाच्या साथीने ९१ धावांची भागीदारी केली. हामझाने दमदार अर्धशतक ठोकले. तो ६२ धावांवर बाद झाला. इतर फलंदाजांची त्याला साथ मिळू शकली नाही.

पहिल्या डावातील अपयशामुळे आफ्रिकेवर फॉलो-ऑनची नामुष्की ओढवली. त्यानंतर दुसऱ्या डावातही आफ्रिकेने खराब कामगिरी केली. त्यांचा डाव १३३ धावांत संपुष्टात आला. डी कॉक, हामझा, बावुमा, हामझा आणि क्लासें या फलंदाजांना दोन अंकी धावसंख्याही गाठता आली नाही. सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाला अणि अवघ्या काही मिनिटात खेळ संपला.