Hikaru Nakamura Viral Celebration Video: बुद्धिबळ खेळातील जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेला हिकारू नाकामुराने भारताच्या युवा विश्वविजेत्या डी गुकेशचा पराभव केला. हा सामना जिंकताच हिकारू नाकामुराने डी गुकेशचा राजा प्रेक्षकांमध्ये फेकून जल्लोष केला. अमेरिकेतील टेक्सासमध्ये भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये फ्रेंडली बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गुकेशने शेवटचा सामना गमावताच भारतीय संघाचा ५-० ने पराभव झाला.

५ भारतीय खेळाडूंचा पराभव

चेकमेट प्रकारात पांढऱ्या सोंगट्यानी खेळताना अमेरिकेने बाजी मारली. यासह भारतावर ५-० ने विजय मिळवला. डी गुकेशचा हिकारू नाकामुराकडून पराभव झाला. तर ग्रँडमास्टर अर्जुन इरिगेसीला फाबियानो कारूआनाकडून, दिव्या देशमुखला कारिसा यिपकडून, सागर शाहला लेवी रोजमनकडून आणि इथज वाजला तानी आवेदुमीकडून पराभवाचा सामना करावा लागला.

सागर आणि गुकेशला वगळलं तर इतर तिन्ही भारतीय खेळाडूंना पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. सागर आणि रोजमन यांच्यात २ सामने पार पडले. या दोन्ही सामन्यांमध्ये सागरला पराभवाचा सामना करावा लागला. डी गुकेशने सुरुवातीचे २ गेम ड्रॉ केले. पण तिसऱ्या गेममधील बुलेट राऊंडमध्ये गुकेशला पराभवाचा सामना करावा लागला.

या सामन्यात भारताचा ५-० ने पराभव झाला. पण भारताच्या पराभवापेक्षा हिकारू नाकामुराने दिलेल्या प्रतिक्रियेची जोरदार चर्चा रंगली आहे. १९ वर्षीय गुकेशला पराभूत केल्यानंतर हिकारू नाकामुराने बुद्धिबळ पटावरील गुकेशच्या बाजूला असलेला राजा उचलला आणि प्रेक्षकांमध्ये फेकला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पण हे भारतीयांना मुळीच आवडलेलं नाही.

भारतीय चाहत्यांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. विजय मिळवल्यानंतर जल्लोष करणं हा विजेत्या खेळाडूचा हक्क आहे. पण त्या खेळाडूने खेळाभावना दाखवून विरोधी खेळाडूंचा आदर करायला हवा असं चाहत्यांचं म्हणणं आहे.