नवी दिल्ली : सन्मानिकांच्या मुद्दय़ावरून मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनने आक्रमक भूमिका घेतल्यामुळे इंदूरला २४ ऑक्टोबरला होणारा भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) विशाखापट्टणमला हलवला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या सामन्याचे यजमानपद इंदूरच्या होळकर स्टेडियमला देण्यात आले होते. मात्र सन्मानिकांसंदर्भात बीसीसीआयची मागणी मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनने धुडकावल्यामुळे हा वाद निर्माण झाला होता. त्यामुळे हा सामना आता विशाखापट्टणम येथील डॉ. वाय. एस. राजशेखर रेड्डी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.

बीसीसीआयच्या घटनेनुसार, स्टेडियमच्या एकंदर क्षमतेच्या ९० टक्के तिकिटे प्रेक्षकांना विक्रीसाठी ठेवणे बंधनकारक आहे. त्यामुळे राज्य संघटनांच्या वाटय़ाला फक्त १० टक्के सन्मानिकाच येणार आहेत. होळकर स्टेडियममध्ये २७ हजार प्रेक्षकक्षमता आहे. त्यामुळे मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनला २७०० तिकिटेच उपलब्ध होणार आहेत. बीसीसीआयला पुरस्कर्त्यांना देण्यासाठी सन्मानिकांची आवश्यकता होती.

मुंबई क्रिकेट असोसिएशनची सावध भूमिका

मुंबई : वानखेडे स्टेडियमवर २९ ऑक्टोबरला होणाऱ्या भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील चौथ्या एकदिवसीय सामन्यासंदर्भात मुंबई क्रिकेट असोसिएशनने सध्या तरी ‘थांबा आणि वाट पाहा’ अशी भूमिका घेतली आहे. मात्र संघटनेच्या वाटय़ाला येणाऱ्या तिकिटांची संख्या अतिशय कमी असल्याचे मत प्रकट केले आहे.

वानखेडे स्टेडियमवर ३३ हजार प्रेक्षकसंख्येची क्षमता आहे. बीसीसीआयच्या नियमानुसार एमसीएच्या वाटय़ाला ३३०० सन्मानिका येतील. या १० टक्के तिकिटांपैकी अर्धी तिकिटे त्यांना बीसीसीआयला द्यावी लागणार आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs west indies second odi moved from indore to visakhapatnam
First published on: 04-10-2018 at 03:39 IST