भारताने महिलांच्या आठव्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत कांस्यपदक पटकाविण्याची किमया साधली. भारतीय संघाने चीनला टायब्रेकरद्वारा ५-४ (पूर्णवेळ २-२) असे पराभूत केले. जागतिक स्पर्धेची पात्रता पूर्ण करण्यात अपयशी ठरलेल्या भारतासाठी हे कांस्यपदक प्रोत्साहन देणारे ठरले. या स्पर्धेतील साखळी गटात भारतास चीनकडून ०-१ असा पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवाची परतफेड भारताने केली. या सामन्यातील पूर्वार्धात अनुराधा देवी थोकचोम (१६ वे मिनिट) व वंदना कटारिया (३१ वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल केला. मात्र उत्तरार्धात चीनच्या खेळाडूंनी जिद्दीने खेळ करीत दोन गोल केले. ५१ व्या मिनिटाला यान येन हिने त्यांचा पहिला गोल केला. ६४ व्या मिनिटाला वुई मेंगरोंग हिने आणखी एक गोल करीत २-२ अशी बरोबरी साधली. त्यानंतर टायब्रेकरमध्ये भारताने ३-२ अशी विजयश्री खेचून आणली. जपानने गतविजेत्या दक्षिण कोरियावर २-१ अशी मात करीत विजेतेपद पटकाविले व जागतिक स्पर्धेसाठी आपला प्रवेश निश्चित केला.