अखेरच्या एकदिवसीय लढतीत विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करून दोन गडी राखून विजयी

ऑस्ट्रेलियाच्या २६ एकदिवसीय सामन्यांचा विजयरथ भारतीय महिला संघाने अखेर रविवारी रोखला. काही दिवसांपूर्वी झालेल्या दुसऱ्या लढतीत भारताच्या पराभवासाठी कारणीभूत ठरलेली अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने (३७ धावांत ३ बळी आणि नाबाद आठ धावा) विजयी चौकार लगावला आणि भारताने तिसऱ्या सामन्यात दोन गडी राखून यजमानांवर सरशी साधली.

एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच भारताने इतक्या धावांचा यशस्वी पाठलाग केला. ऑस्ट्रेलियाने दिलेले २६५ धावांचे लक्ष्य भारताने ४९.३ षटकांत गाठले. ऑस्ट्रेलियाने ही मालिका २-१ अशा फरकाने जिंकली, परंतु अखेरच्या लढतीत त्यांना धूळ चारल्याने आता ३० सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या प्रकाशझोतातील एकमेव कसोटी सामन्यापूर्वी भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास बळावला आहे.

शफाली वर्मा (५६) आणि स्मृती मानधना (२२) यांनी ५९ धावांची सलामी दिल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरील युवा यास्तिका भाटियानेसुद्धा नऊ चौकारांसह ६४ धावांची दमदार खेळी साकारली. मात्र या तिघींनंतर मधली फळी ढेपाळल्याने भारत संकटात सापडला. दीप्ती शर्मा (३१) आणि स्नेह राणा (३०) यांनी उपयुक्त योगदान देत भारताला विजयासमीप नेले. अखेरच्या षटकात चार धावांची आवश्यकता असताना झुलनने चौकार लगावला. विजयानंतर तिने आणि सर्व भारतीय खेळाडूंनी उत्साहाने आनंद साजरा केला. दुसऱ्या लढतीत झुलनला अखेरच्या षटकात १३ धावांचा बचाव करण्यात अपयश आले होते.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना अ‍ॅश्ले गार्डनर (६७) आणि बेथ मूनी (५२) यांच्या अर्धशतकांमुळे ऑस्ट्रेलियाने ९ बाद २६४ धावा केल्या. झुलन आणि पूजा वस्त्रकार यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवले.

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया : ५० षटकांत ९ बाद २६४ (अ‍ॅश्ले गार्डनर ६७, बेथ मूनी ५२; झुलन गोस्वामी ३/३७, पूजा वस्त्रकार ३/४६) पराभूत वि. भारत : ४९.३ षटकांत ८ बाद २६६ (यास्तिका भाटिया ६४, शफाली वर्मा ५६; अ‍ॅनाबेल सदरलँड ३/३०)

’ सामनावीर : झुलन गोस्वामी

भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट मालिका

संघातील अनुभवी खेळाडू म्हणून मला कामगिरी उंचावणे गरजेचे होते. दुसऱ्या लढतीतील पराभव निराशाजनक होता. त्यामुळे आज विजयी चौकार लगावल्यावर मला भावनांवर नियंत्रण राखणे कठीण गेले.

– झुलन गोस्वामी, सामनावीर

२०१८ मध्ये भारताला नमवूनच ऑस्ट्रेलियाच्या विजयी मालिकेला प्रारंभ झाला. त्यामुळे आम्हीच त्यांची ही मालिका संपुष्टात आणल्याचा आनंद आहे. गेल्या काही वर्षांत असंख्य युवा खेळाडू गवसल्याने संघामध्ये वेगळीच ऊर्जा संचारली असून आमच्या कामगिरीत अधिक सकारात्मकता आली आहे.

– मिताली राज, भारताची कर्णधार

६०० झुलन गोस्वामीने कारकीर्दीतील (आंतरराष्ट्रीय+स्थानिक) ६०० बळींचा टप्पा गाठला. त्याशिवाय ऑस्ट्रेलियाची कर्णधार लॅनिंगला दोनदा शून्यावर बाद करणारी ती पहिलीच गोलंदाज ठरली.