भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडचा त्यांच्याच घरच्या मैदानावर दारुण पराभव करत मालिका आपल्या नावे केली आहे. भारतच्या पुरुष क्रिकेट संघानंतर आता टीम इंडियाच्या महिला संघाने या विजयासह इतिहास घडवला आहे. पुरुष संघाने ५८ वर्षांनंतर बर्मिंगहममध्ये कसोटी जिंकत भारताच्या पराभवांचा दुष्काळ संपवला. तर आता महिला संघाने इंग्लंडविरुद्ध १९ वर्षांनी त्यांच्या घरच्या मैदानावर टी-२० मालिका जिंकली आहे.
भारत आणि इंग्लंड महिला संघांमध्ये पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेत टीम इंडियाने ३-१ च्या फरकाने दणदणीत विजय मिळवला आहे. इंग्लंडला चौथ्या टी-२० सामन्यात ६ विकेट्सने पराभूत करत मालिका आपल्या नावे केली. भारताने २००६ नंतर पहिल्यांदाच इंग्लंडच्या भूमीवर टी-२० मालिका जिंकली आहे. याशिवाय टीम इंडियाने पहिल्यांदाच इंग्लंडला २ किंवा त्याच्यापेक्षा जास्त सामन्यांच्या टी-२० मालिकेत हरवलं आहे.
टीम इंडियाने चौथ्या टी-२० सामन्यात इंग्लंडचा ६ विकेट्सने पराभव करत मालिके त अजेय आघाडी मिळवली आहे. दोन्ही संघांमधील एक टी-२० सामना अद्याप शिल्लक असला तरी टीम इंडियाने ३-१ च्या फरकाने विजय मिळवला आहे. भारतीय संघाने १९ वर्षांनंतर पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये मालिका जिंकली आहे. याशिवाय भारताची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माने एक विक्रम आपल्या नावावर केला आहे.
दीप्ती शर्मा T20I मध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. तिने १२८ सामन्यांमध्ये १४५ विकेट्स घेतल्या आहेत. तिने पाकिस्तानच्या निदा दारला मागे टाकलं आहे. निदा दारने १४४ विकेट्स घेतल्या आहेत. या बाबतीत ऑस्ट्रेलियाची मेगन शट अव्वल स्थानी आहे. जिने सर्वाधिक १५१ विकेट्स घेतले आहेत.
मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या चौथ्या सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांविरुद्ध धावा करण्यासाठी फार संघर्ष करावा लागला. इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेत दीप्ती शर्माने आतापर्यंत ७ विकेट घेतले आहेत.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत इंग्लंड महिला संघाने २० षटकांत सात गडी बाद फक्त १२६ धावा केल्या. इंग्लंडच्या डावाची सुरुवात सोफिया डंकले आणि डॅनी व्याट हॉज यांनी केली. इंग्लंडला पहिला धक्का डॅनीच्या (५ धावा) रूपात बसला. यानंतर चांगल्या फॉर्ममध्ये असलेली डंकले २२ धावा करत माघारी परतली. यानंतर, अॅलिस कॅप्सी आणि कर्णधार तमसिन ब्यूमोंट यांनी डाव पुढे नेला आणि संघासाठी महत्त्वाच्या धावा जोडल्या. ११ व्या षटकात तमसिनला राधा यादवने बाद केलं. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी ३५ धावांची भागीदारी केली. तमसिनने १९ चेंडूत २० धावा केल्या. तर कॅप्सी १८ धावा करत माघारी परतली. यानंतर इंग्लंडचा डाव कोसळला. भारताकडून चरणी आणि राधा यादवने प्रत्येकी २ विकेट्स घेतले. तर अमनजोत कौर आणि दीप्ती शर्मा यांनी १-१ विकेट घेतली.
इंग्लंडने दिलेल्या १२७ धावांचा पाठलाग करताना भारताने जोरदार सुरुवात केली. स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी ४२ चेंडूत ५६ धावांची भागीदारी केली. सातव्या षटकात शेफाली बाद झाली. शेफालीने १९ चेंडूत ३१ धावांची शानदार खेळी केली. यादरम्यान तिने ६ चौकार मारले. त्यानंतर जेमिमा रॉड्रिग्ज मानधनाला साथ देण्यासाठी मैदानात आली. नवव्या षटकात एकलस्टनने मानधनाच्या रूपात भारताला दुसरा धक्का दिला. स्मृती ३१ चेंडूत पाच चौकारांसह ३२ धावांची महत्त्वाची खेळी खेळली.
जेमिमा आणि हरमनप्रीत कौर यांनी इंग्लंडच्या सामन्यात पुनरागमन करण्याच्या आशा धुळीस मिळवल्या आणि संघाचा धावसंख्या १०० धावांच्या पुढे नेली. यानंतर भारताने सलग दोन विकेट गमावल्या. १६ व्या षटकात हरमनप्रीत बाद झाली. तिने २५ चेंडूत २६ धावांची खेळी केली. यानंतर अमनजोत कौर फक्त दोन धावा काढून बाद झाली. यानंतर जेमिमा आणि ऋचा घोष यांनी १७ व्या षटकातच संघाला विजय मिळवून दिला.