देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने निश्चलनीकरणाचा निर्णय घेतला. गेल्या महिन्याभरात या निर्णयामुळे मोठय़ा प्रमाणात त्रास देशवासीयांना सोसावा लागत आहेच. त्याचबरोबर या निर्णयाचा मोठा फटका क्रिकेटच्या सच्च्या चाहत्यांनाही बसला आहे. इंग्लंडमधून आलेले चाहते, ‘बार्मी-आर्मी’ आणि भारताच्या कट्टर क्रिकेटप्रेमींचीही या निर्णयामुळे ससेहोलपट होत आहे.
निश्चलनीकरणाचा निर्णय झाला आणि त्यानंतर लगेचच भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला राजकोट येथे प्रारंभ झाला. या सामन्यासाठी इंग्लंडच्या चाहत्यांनी तिकिट्स ऑनलाइन खरेदी केल्या होत्या. पण या खरेदीची पावती घेऊन प्रत्येकाला तिकीट खिडकीवर जावे लागते आणि पैसे भरून सामन्याच्या तिकिट्स घ्याव्या लागतात. भारतात आल्यावर इंग्लंडच्या चाहत्यांकडे जास्त करून पाचशे आणि हजारांच्या नोटा होत्या. या नोटा तिकीट खिडकीवर घेण्यास नकार देण्यात आला. या पाचशे आणि हजारांच्या नोटांवर बंदी आल्यामुळे त्यांना तिसऱ्या दिवशी या तिकिट्स मिळाल्या. पण त्यानंतर अजूनपर्यंतही त्यांना या निर्णयाचा त्रास सहन करावा लागत आहे.
या निर्णयाबाबत ‘बार्मी-आर्मी’चा ग्रॅहम स्टीफन्सन म्हणाला की, ‘‘आम्ही सामने पाहण्यासाठी भारतात आलो आहोत. आमच्याकडे कुठला काळा पैसा असणार? त्यामुळे या निर्णयाचा सर्वात जास्त त्रास आम्हाला झाला आहे. भारतामध्ये येण्यापूर्वीच आम्ही डॉलर्सचे रूपांतर रुपयांमध्ये केले होते आणि जवळपास साऱ्याच नोटा पाचशे आणि हजाराच्या होत्या. त्यामुळे या नोटा बदलणे अतिशय अडचणीचे ठरले. पर्यटकांसाठी तरी केंद्र सरकारने या नोटाबदलीसाठी विशेष सुविधा करायला हवी होती. पण तसे काहीच घडताना दिसत नाही.’’
याबाबत इंग्लंडचे चाहते ख्रिस जॉन म्हणाले की, ‘‘या निर्णयाचा सन्मान करायला हवा. पण या निर्णयाची योग्य अंमलबजावणी कशी करता येईल, याकडे सरकारने लक्ष द्यायला हवे होते, ते सरकारकडून झालेले नाही. आम्ही भारतात येण्यापूर्वी पैसे बदलले होते, पण काही डॉलर्स आमच्या जवळ ठेवले होते. या डॉलर्समुळे आम्ही आतापर्यंत तगलो आहोत. नोटा बदली करण्यासाठी आमचे खाते भारतात नाही आणि मध्यस्थी करणाऱ्या व्यक्ती फार जास्त शुल्क आकारत आहेत. या परिस्थितीमध्ये आम्ही नेमके काय करावे, याचे उत्तर सरकारने द्यायला हवे.’’
भारताचा धरमवीर हा विकलांग असला तरी क्रिकेटवरील प्रेमाखातर जवळपास प्रत्येक सामन्यासाठी ‘बॉल बॉय’ म्हणून हजेरी लावतो. या निर्णयाबाबत तो म्हणाला की, ‘‘जवळपास प्रत्येक सामने पाहायला मी जात असतो. त्यामुळे गाठीशी जास्त पैसेही ठेवावे लागतात. प्रवासासाठी पाचशे आणि हजाराच्या नोटा जास्त करून वापरल्या जातात. त्यामुळे या निर्णयाचा जबर मनस्ताप मला सहन करावा आहे. निर्णय जाहीर झाल्यावर नोटा बदली करण्यासाठी काही दिवस मला कुणीही मदत केली नाही. पण मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या संघटनेने मला याबाबत चांगली मदत केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाचे स्वागत करायला हवे. पण त्यामुळे सामान्यांना होणार त्रास कधी कमी होणार, याचे उत्तर सापडत नाही.’’
भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा निस्सीम चाहता सुधीर गौतम हासुद्धा भारताच्या जवळपास प्रत्येक सामन्याला उपस्थित असतो. या निर्णयाबद्दल तो म्हणाला की, ‘‘निश्चलनीकरणाचा त्रास साऱ्यांनाच भोगावा लागत आहे. मला प्रायोजकत्व देणाऱ्या लोकांना या गोष्टीचा त्रास झाला आणि त्याचा परिणाम माझ्यावरही झाला. पण प्रत्येक निर्णयाच्या चांगल्या आणि वाईट बाजू असतात. त्यामुळे या निर्णयामधून जे काही चांगले आहे ते आपण घ्यायला हवे.’’